रायगड : वाढत्या तापमानाचा दुधाळ जनावरांच्या आरोग्यावर परिणाम | पुढारी

रायगड : वाढत्या तापमानाचा दुधाळ जनावरांच्या आरोग्यावर परिणाम

अलिबाग; रमेश कांबळे :  शहरासह जिल्ह्याचे तापमान ३३ अंशांपेक्षा अधिक होत आहे. त्यामुळे माणसाप्रमाणेच जनावरांनाही उन्हाचा फटका बसत आहे. दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात मोठी घट होत आहे. शारीरिक तापमान एक अंश सेल्सिअसने वाढल्यास एक लिटरपर्यंत दुधात घट होऊ शकते. दुधाची प्रत घसरते. दुधातील फॅट, एसएनएफ, साखर, प्रथिने इत्यादींची पातळी खालावते.

मात्र, सध्या घरोघरी जाऊन दूध वाटप करणाऱ्या दूध उत्पादकांना ‘दादा, दूध पातळ येतेय, म्हशीला जास्त पाणी पाजताय का,’ असा सवाल विचारला जात आहे. वाढत्या माणसांप्रमाणेच उष्णतेचा परिणाम जनावरांच्याही आरोग्यावर होत आहे. सर्वाधिक फटका दुभत्या जनावरांना बसत असून, दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत आहे. यामुळे दुग्ध व्यावसायिकांचे नुकसान होत असून, त्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. जनावरांच्या गोठ्याचे व आहाराचे व्यवस्थापन न केल्यास जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. दुभती जनावरे जास्त दूधनिर्मिती करत असल्यामुळे दूध निर्माण करताना शरीरात जास्तीची उष्णता निर्माण होते. परिणामी, दुभती जनावरे उन्हामुळे आजारी पडतात. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे दूध उत्पादनात घट झालेली आहे.

तीव्र उष्णतेच्या लाटेचा दुग्ध व्यवसायावर परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या दुधाचा दर्जा खालावत आहे. दुसरीकडे पशुपालकांना वाढल्या उन्हामुळे दुध उत्पादनात घट सहन करावी लागत आहे.

दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्याल?

उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा खाण्यास द्यावा. मुबलक पाणी पिण्यास द्यावे. या दिवसात जनावरांना भूक कमी लागते, मात्र तहान जास्त लागते. यामुळे गुरांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावे. साधारण दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यास द्यावे. त्यामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान नियंत्रित राहते. यासह आपण जर गुरांना पाण्यात मीठ आणि पीठ टाकून पिऊ घातल्यास ते फायदेशीर असते.पारा ३३ अंशांवर शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. यामुळे मानवी आरोग्याप्रमाणेच जनावराचेही आरोग्य बिघडत आहे. वाढत्या उन्हापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

दूध उत्पादन घटले

शेतीला जोड व्यवसाय म्हणून जिल्ह्यातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र, सध्या वाढत्या तापमानाचा दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button