रायगड; पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा समावेश करण्यात आला असून त्याच पार्श्वभूमीवर सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यावसायिक विषयांचे धडे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे वर्षभरामध्ये दहा दिवस असा दप्तराविना उपक्रम राबवण्यात येणार असून त्याअंतर्गत चित्रपटही पाहण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षकांसह एकत्र चित्रपट पाहता येणार असून त्यावर आपली मतेही नोंदविता येणार आहेत. देशभरात सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणाऱ्या प्री-व्होकेशन क्रॉस करिक्युलर टीचिंग लर्निंग मॉडेल व्यवसाय अभ्यासक्रमाची रचना 'लेंड अ हॅण्ड' इंडियाने केली आहे. राज्यात त्याच पार्श्वभूमीवर समग्र शिक्षा अभियान आणि एससीईआरटीच्या माध्यमातून त्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्याची तोंडओळख सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना केली जाणार आहे. त्यासाठीच 'दहा दिवस दप्तराविना' अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना वर्षभर शिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर त्या परिसरातील विविध उद्योग कौशल्य आणि कलांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जाणार असून त्यासाठी क्षेत्रभेटीचे मार्गदर्शन आणि विविध चर्चासत्र आदींचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी नुकतीच शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे.
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायविषयक अभ्यासक्रमाची तोंडओळख असली, तरी असा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी माहिती मिळावी म्हणून फायद्याचा ठरेल, असे समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगार यांनी सांगितले. प्रमुख उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे आणि घरी बनवण्यात येणारे पदार्थ लक्षात यावेत म्हणून त्यासाठी नवीन खाद्यपदार्थ बनवणे आदी उपक्रम असतील. त्यासोबतच खाद्यपदार्थांवरील लेबल आणि त्यातील घटक समजून घेणे, जैवविविधता इत्यादी उपक्रमांत संदर्भ पुस्तके, विज्ञान पाठ्यपुस्तके आणि राज्यातील प्राणी व वनस्पतींची माहिती त्यासोबतच संतुलित आहार, कचरा वर्गीकरण, विद्युत आणि अग्निसुरक्षा, प्रथमोपचार आणि शोधण्याचा उत्तम पर्याय आहे. घरगुती उपाय, कौटुंबिक इतिहास, आदर्श गाव परिसर, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत, पालकांचा व्यवसाय, वाहतुकीची चिन्हे, पतंग बनवणे, कागद काम करणे आणि सर्वांत शेवटी संपूर्ण वर्गासाठी चित्रपट बघणे असा एक उपक्रम त्यामध्ये असणार आहे.