

पेण; पुढारी वृत्तसेवा : येत्या २८ मार्च रोजी आई एकविरा कार्ला येथील यात्रेला प्रारंभ होत असून या यात्रेसाठी जाणाऱ्या कोळी बांधवांसह इतर भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी रायगड एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. रायगडमधील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने विविध आगारातून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्ला यात्रा ही कोळी+ बांधवांसाठी महत्त्वाची मानली जात असून रायगड जिल्ह्यातील हजारो कोळी बांधव आणि इतर आई एकविरेचे भाविक कार्ला येथे यात्रेसाठी आणि देवीच्या दर्शनासाठी जात असतात. २८ मार्च रोजी यात्रेचा मुख्य दिवस जरी असला तरी अनेक भाविक हे यात्रेच्या एक दोन दिवस अगोदरच कार्ला येथे यात्रेसाठी रवाना होत असतात. त्यामुळे एसटी महामंडळाने यात्रेच्या आदल्या दिवशीच म्हणजेच २७ मार्च रोजी आणि यात्रेच्या दोन दिवसनंतर म्हणजेच ३० मार्चपर्यंत जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि धोका पत्करून खाजगी वाहनांचा वापर करू नये यासाठी एसटी महामंडळाने आपल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रायगड परिवहन विभागातील अलिबाग, पेण, कर्जत, रोहा आणि मुरुड या पाच आगारातून या जादा गाड्या सोडण्यात येणार असुन अलिबाग कार्ला, पेण- कार्ला, मुरुड कार्ला, रोहा – कार्ला, पनवेल- कार्ला या मार्गावर देखील प्रवसी गर्दीचा अंदाज घेऊन गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्याच प्रमाणे यात्रेच्या ठिकाणी काही गाड्या वस्तीच्या प्रकारे तिथेच वास्तव्याला ठेऊन जशी प्रवाशांची गर्दी असेल त्याप्रमाणे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती रायगड नियंत्रक विभाग प्रमुख दीपक घोडे यांनी दिली.