अवकाळीमुळे हापूस आंब्याचा गोडवा हरपणार | पुढारी

अवकाळीमुळे हापूस आंब्याचा गोडवा हरपणार

रायगड; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पडलेला पाऊस, त्यानंतर वाढलेले तापमान याचा विपरीत परिणाम आंब्यावर झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे रायगड जिल्ह्यात फळधारण- पूर्वीच मोहर गळू लागला आहे. त्यामुळे २५० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता असल्याने बागायतदार चांगलेच हवालदिल झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली जाते. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मॅट्रिक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मुबलक पाऊस आणि थंडी पडल्याने आंबा पीक चांगले अशी अपेक्षा बागायतदारांना होती परंतु अवकाळी पाऊस, तापमान वाढीमुळे फळ गळतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अलिबाग, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, तळा तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाले असून आंबा उत्पादनात मोठी घट होईल अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

संकटांची मालिका सुरूच

दरवर्षी आंब्याला ऑक्टोबर महिन्यात पालवी येण्यास सुरुवात होते. जानेवारी महिन्यात या पालवीला मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होते. यंदाही प्रक्रिया उशिरा सुरू झाली एकूण उत्पादनक्षम क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर मोहर आला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा बाजारात मुबलक प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. मात्र आंबा तयार होण्याच्या स्थितीत असतानाच अवकाळी पावसासोबत तापमान वाढीमुळे पीक नष्ट होण्याची भीती बागायतदारांना वाटत आहे.

Back to top button