रायगड : आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे .. एका पायावर आकाशने सर केला रायगड | पुढारी

रायगड : आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे .. एका पायावर आकाशने सर केला रायगड

नाते; इलियास ढोकले :  प्रचंड आत्मविश्वास व इच्छा शक्तीचा जोरावर आजच्या स्पर्धात्मक युगात देखील अशक्य काही नाही याचे मूर्तीमंत उदाहरण किल्ले रायगडावर पुणे येथील निगडीच्या विद्यानिकेतन शाळेत सहावी इयत्ता मध्ये शिकणाऱ्या ओंकार लकडे याने किल्ले रायगड सर करुन सर्वांच्या समोर ठेवले आहे. ओंकार लकडे याने आपल्या बहाद्दर कामगिरीने गडावर आलेल्या सर्व शिवभक्तांचे हृदय जिंकून घेतले आणि आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे या उक्तीचा खरा प्रत्यय सर्वांना आमून दिला.

एका अपघातामध्ये आपला उजवा पाय गमावलेल्या ओंकार लकडे याने शाळेच्या किल्ले रायगडाला निघालेल्या सहलीमध्ये आपले नाव नोंदवून सर्व सहकारी मित्र तसेच शिक्षकांना एक सुखद धक्का दिला होता. शालेय व्यवस्थापनाने त्याला सहलीच्या चमूमध्ये सामील करून किल्ले रायगडकडे प्रयाण केले. सोबतचे सर्व विद्यार्थी किल्ल्यावर चालत निघाले असता, ओंकारने देखील गड चढूनच जाण्याचा निश्चय केला. आपल्या शारीरिक अडचणीवर मात करत मोठ्या जिद्दीने सव्वा दोन तासांमध्ये सुमारे गडाच्या १२०० पायऱ्यांचा चढून किल्ले रायगड सर करून छत्रपती शिवरायांच्या राजदरबारात जाऊन ओंकरने मुजरा करून एका परीने भीमपराक्रमाची साक्ष दिली.
ओंकार लकडे हा शालेय स्तरावर होणाऱ्या विविध बौद्धिक चाचणींमध्ये देखील सर्वोत्तम कामगिरी करत असल्याची माहिती त्याच्या शिक्षकांकडून मिळाली.

काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातामध्ये त्याला आपला उजवा पाय गमवावा लागला होता. त्यानंतर काठीच्या सहाय्याने त्याने आपले जीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. किल्ले रायगड पायऱ्या चढून जाण्याच्या निर्णयातून त्याने दाखवलेली इच्छाशक्ती ही महत्त्वपूर्ण असून या सव्वा दोन तासाच्या काळात किल्ल्यावरून उतरणाऱ्या व त्याच्या समवेत चालणाऱ्या शालेय विद्यार्थी सहकार्यांना त्यांनी दिलेला हा आदर्श धडा असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गातून व्यक्त झाल्या. इच्छाशक्ती, जिद्द, मेहनत व चिकाटी या सर्व गोष्टी ओंकार मध्ये ठासून भरल्या कारणा- नेच हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर तो यशस्वी चढाई करू शकला आहे.

Back to top button