रायगड : अलिबागजवळ बोट बुडाली, १ बेपत्ता, ३ जण बचावले | पुढारी

रायगड : अलिबागजवळ बोट बुडाली, १ बेपत्ता, ३ जण बचावले

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  अलिबाग कोळीवाडा येथील मच्छीमार रणजित खमिस यांच्या मालकीची अन्नपूर्णा लक्ष्मी नावाची नोंदणी क्र. आयएनडी/एमएच/३/एमएम/९१४ असलेली समुद्रात मच्छीमारी साठी गेलेली बोट गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बुडाल्याची घटना घडली आहे. या नौकेवर १ तांडेल व ३ खलाशी कार्यरत होते. यापैकी एक जण बेपत्ता असून तीन जण सुखरूप असून बेपत्ता असलेल्या खलाश्याचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेत बोट समुद्रात बुडाली असल्याने बोट मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

रणजित खमिस याच्या चार मच्छीमार बोटी आहेत. यापैकी अन्नपूर्णा लक्ष्मी बोट बुधवारी सकाळी दहा वाजता दोन दिवसांसाठी मच्छीमारीसाठी अलिबाग कोळावाडी येथून निघाली होती. आशिष निषाद, रा. तुलसीपट्टी, जिल्हा सुलतानपूर, यू पी. ( नौकेचे तांडेल.), सर्वेश निषाद, रा बरवारीपुरी, जिल्हा -सुलतानपूर, यू पी (खलाशी), विशाल निषाद, रा. दीपाईपुर्ण, जिल्हा -जौनपुर, यू पी (खलाशी ), राम सजीवन निषाद, रा. रेवारी, जिल्हा -सुलतानपूर, यू पी. (खलाशी) हे बोटीवर होते. अन्नपूर्णा लक्ष्मी बोट बुडाल्यानंतर राम सजीवन निषाद हा खलाशी बेपत्ता झाला आहे. अलिबाग वरून कुलाबा किल्ल्याच्या पुढे कोर्लई मच्छिमारांची मच्छीमारी सुरू होती. रात्रौ १२ वाजेपर्यंत नौकेने’ डोल नेट वापरून मासेमारी केली.  पहाटे ३ वाजता नौकेवरील ४ ही जण झोपी गेले. जेव्हा अंगाला समुद्राचे पाणी लागले त्यावेळेस त्यांना समजले की बोट समुद्रात बुडत आहे त्यावेळेस सर्व धावपळ झाली. आणि त्या गडबडीत जीव रक्षक साधने आदि मिळू शकली नाहीत. बोट बुडत असल्याचे पाहून तांडेल आणि खलाशी घाबरले आणि त्यांनी समुद्रात उड्या मारल्या. त्याचवेळी अन्य बोटिमधील खलाशी यांनी आपल्या जवळील जीवसुरक्षा साहित्य टाकून आशिष निषाद (तांडेल) सर्वेश निषाद आणि विशाल या खलाश्याना वाचविण्यात यश आले. तर राम निषाद यालाही वाचविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र अडचणी आल्या.

६ वाव समुद्रातील दुर्घटना…

मासेमारी बोट बुडाल्याची घटना अलिबाग समोरील ५ ते ६ वाव खोल पाण्यात घडली. सदर घटनेचे ठिकाण अलिबाग किनाऱ्यापासून दीड ते दोन सागरी मैल अंतरावर आहे. नौका ६.०४ टन वजनाची असुन नौकेची लांबी ९.६ मी, नौकेची रुंदी ३ मी, नौकेची खोली ०.९३ मी आहे. नौकेला वरील घटनास्थळी जलसमाधी मिळाली आहे. जलसमाधी का मिळाली याचे नेमके कारण अद्याप नीट समजू शकलेले नाही. तपास व चौकशी चाल आहे. नौकेचे बांधणी वर्ष २००९ असुन नौकचा मासेमारी परवाना २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वैध आहे.

Back to top button