रायगड : बॅाडीबिल्डर स्पर्धेत सुभाष पुजारी यांनी पटकावले गोल्ड मेडल | पुढारी

रायगड : बॅाडीबिल्डर स्पर्धेत सुभाष पुजारी यांनी पटकावले गोल्ड मेडल

पनवेल: पुढारी वृत्तसेवा: पुणे येथे झालेल्या 71 व्या ऑल इंडिया पोलीस गेम 2022 या बॅाडीबिल्डर स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 80 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल पटकावले. तसेच champion of champion भारतीय पोलीस दलातील मानाचा किताब आपल्या नावावर कोरला. भारतीय पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट बॅाडीबिल्डर होण्याचा मान मिळवून त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

या स्पर्धेसाठी 36 संघानी व 2500 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. पुजारी यांनी गेल्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत सातत्याने गोल्ड मेडल मिळवत पोलीस दलाचे नाव उंचावले आहे. पुणे येथे झालेल्या या स्पर्धेसाठी पुजारी यांना वर्ल्ड बॉडीबिल्डींगचे सेक्रेटरी चेतन पाठारे, वर्ल्ड बॉडीबिल्डिंग लिगल अॅडव्हायझर विक्रम रोठे, साऊथ एशिया बॉडीबिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सपाटे, पत्नी रागिणी पुजारी, सुदर्शन खेडेकर (डोंबिवली), सागर डमाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंदकांत पाटील, क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थित पारितोषिक वितरण करण्यात आले.

मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी सुभाष पुजारी यांची भारतीय संघात निवड

दि. ६ ते १२ डिसेंबर २०२२ या दरम्यान थायलंड येथे होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी सुभाष पुजारी यांची भारतीय संघातून निवड झाली आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी पुजारी दररोज सहा तास सराव करत आहेत. सुनीत जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ व कोअर जीम खारघर येथे ते सराव करत आहेत.

दरम्यान, जुलै २०२२ मध्ये मालदिव येथे झालेल्या मिस्टर एशिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पुजारी यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे. ताश्कंद, उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळविले होते. तसेच सलग दोनवेळा भारतश्री व महाराष्ट्र श्री हा किताब त्यांनी पटकावला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button