

माथेरान; मिलिंद कदम : दिवाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ला सुरुवात झाली असून शनिवारी तब्बल तीन वर्षांनंतर नेरळ होऊन सुटलेली मिनी ट्रेन सकाळी 11:30 वाजता माथेरान स्थानकात दाखल झाली. माथेरानकरांनी तीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
अनेक पर्यटकांच्या आठवणींमध्ये घर करून असलेली नेरळ- माथेरान मिनी ट्रेन सफारी गेल्या तीन वर्षांपासून बंद होती. नेरळ- माथेरान प्रवास हा प्रत्येक पर्यटकाला नेहमीच हवाहवासा वाटला आहे. परंतु, ही ट्रेन बंद असल्यामुळे येथे येणारे पर्यटक नेहमीच आपली नाराजी दर्शवत असत. परंतु, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांनी ही ट्रेन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर या मार्गावरील सुरक्षिततेची कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली. याकरिता रेल्वे सुरक्षा पथकाने सुचवलेल्या अनेक सूचनांचे पालन करण्यासाठी रेल्वेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. आणि अखेर ही ट्रेन पर्यटकांच्या सेवेत सुरू झाली आहे.
सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नेरळ स्थानकातून सुटलेली मिनी ट्रेन सकाळी 11 वाजता माथेरानमध्ये दाखल झाली. पहिल्याच ट्रेनला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता. ट्रेन संपूर्णपणे पर्यटकांनी खचाखच भरली होती. सध्या या मार्गावर ट्रेनच्या दोन फेर्या सुरू होणार असून रेल्वे प्रशासनाकडून पुढील फेर्यांबाबत निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. दुपारी सुटणार्या गाडीचे वेळापत्रक पर्यटकांसाठी गैरसोयीचे असून काही वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने याच वेळेस गाडी सुरू केली होती. पण त्यामुळे शटल सेवेच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम दिसून आल्याने ही फेरी बंद करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा या वेळापत्रकात बदल व्हावा अशी मागणी माथेरानकर आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे.
नवीन वेळापत्रकात नेरळहून 2 फेर्या ठेवण्यात आल्या आहेत. सकाळी 8.50 वाजता मिनी ट्रेन नेरळहून सुटून माथेरानला सकाळी 11.30 वाजता पोहोचेल. तर दुसरी फेरी नेरळहून दुपारी 2:20 वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि माथेरानला संध्याकाळी 5 वाजता पोहोचेल. नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन प्रवासाला दोन तास चाळीस मिनिटे लागणार आहेत.
ही ट्रेन सुरू झाल्याने अमन लॉज ते माथेरान शटल सेवेच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम दिसून आला होता. रेल्वे प्रशासनाने शटल सेवेच्या दोन फेर्या रद्द केल्या होत्या पण माथेरानचे अजय सावंत, विवेक चौधरी, प्रसाद सावंत यांनी रेल्वे अधिकार्यांची मुंबई येथे भेट घेऊन दिवाळी हंगामामध्ये शटल सेवा जुन्या वेळापत्रकानुसारच असावी अशी मागणी केल्याने रद्द झालेल्या दोन फेर्या पुन्हा सुरू करत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.