पनवेल : कर्नाळा किल्ला ढासळतोय! | पुढारी

पनवेल : कर्नाळा किल्ला ढासळतोय!

पनवेल; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाळा किल्‍ला ढासळत असल्याने काही काळ गडावर पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तशी सूचना वन्यविभाग ठाणे यांच्यावतीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. त्यामुळे गडावर येणारे पर्यटक, इतिहास अभ्यासक नाराजी व्यक्‍त करत आहेत. जोरदार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून किल्ल्यावरील भिंत ढासळली, लोखंडी रेलिंग वाकल्या आहेत, प्रवेशद्वार कमान आणि तटबंदी पडण्याच्या स्थितीत आहे. किल्ल्याच्या बुरुजाला तडे गेले असून किल्ल्यावर जाणार्‍या वाटेवर काही ठिकाणी दरड कोसळून भूस्खलनही होत असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने वन विभागाने पर्यटकांना प्रवेशास मनाई केली आहे.

हा किल्ला वन विभाग परिसरात असल्यामुळे राज्य संरक्षित स्मारकात किल्ल्याची नोंद नाही. राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येत नसल्यामुळे या किल्ल्याच्या दुर्ग अवशेषांची, तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्या आणि प्रवेशद्वार याची डागडुजी शास्त्रशुद्ध पद्धतीने होत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे या किल्ल्यावर कोणतीही जतन संवर्धनाची कामे झाली नाहीत. सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेकडून हा किल्ला संरक्षित स्मारकात नोंद व्हावी, यासाठी राज्य पुरातत्व विभागाकडे एप्रिल 2018 पासून पत्रव्यवहार सुरू आहे, अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठान
हिंदुस्थान – पनवेल विभाग सदस्य मयूर टकले यांनी दिली. किल्ल्याच्या संवर्धनाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे किल्ल्याची पडझड सुरू आहे. त्यामुळे पर्यटक आणि शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. रायगड जिल्ह्यातील ऐतिहासक आणि प्रसिद्ध या किल्ल्याच्या संवर्धनासाठी वन विभाग आणि राज्य पुरातत्व विभागाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी संस्थेचे पेण विभाग सदस्य रोशन टेमघेरे यांनी केली.

कर्नाळा किल्ला हा प्राचीन कालखंडापासून प्रसिद्ध आहे. कर्नाळा किल्ल्याचा उल्लेख यादव काळात सुद्धा आढळतो. इ.स. 1657 मध्ये हा किल्‍ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. पुढे पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. 1670 मध्ये मराठ्यांनी पुन्हा कर्नाळा किल्ला आपल्या साम्राज्यात आणला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार
होते.

संबंधित बातम्या
Back to top button