

रायगड : रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका, विविध नगरपालिका व नगरपंचायत हद्दीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण ३५४ ईमारती धाेकादायक निष्पन्न झाल्या असून त्यातील ६८ इमारती अतिधाेकादायक तर २८६ इमारती धाेकादायक आहेत. अतिधाेकादायक ६८ इमारतीमध्ये ६३ खासगी तर ५ सरकारी इमारती आहेत. धाेकादायक २८६ इमारतींमध्ये २७० खासगी तर ६५ सरकारी इमारती आहेत.
पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील नागरी भागातील या धाेकादायक इमारती काेसळण्याच्या संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली असून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये स्थलांतराकरिता नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील खाेपाेली नगरपालिका क्षेत्रात ७० धोकादायक इमारती असून त्यामध्ये ५८ खाजगी आणि १२ शासकीय इमारतींचा समावेश आहे. तसेच अतिधोकादायक श्रेणीत १ खाजगी व १ शासकीय इमारत आहे. येथील शिळफाटा भाजी मार्केट खाली करण्यासंबंधीची कार्यवाही सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
उरण नगरपरिषद हद्दीत ५१ धाेकादायक इमारतींची नोंद असून प्रत्यक्षात खाजगी ६५ व शासकीय ४९ अशा ११४ इमारतींना त्यापासून धाेका आहे. तसेच १७ अतिधोकादायक इमारतींमध्ये १५ खाजगी आणि २ शासकीय इमारती आहेत. येथील नागरिकांच्या स्थलांतरासाठी नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात जून, जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे या धोकादायक इमारतींबाबत संबंधित प्रशासनाला सतर्क रहावे लागणार आहे.
पनवेल मनपा क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींतील नागरिकांना स्थलांतराचे आवाहन
पनवेल महानगरपालिका हद्दीत ६४ इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने घरे रिकामी करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले असून संबंधीत रहिवाशांना नाेटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.
पेणमध्ये ४८ तर महाडमध्ये २६ इमारती धाेकादायक
पेणमध्ये एकूण ४८ इमारती धाेकादायक असून त्यांत ३५ खासगी इमारती धोकादायक असून १३ अतिधोकादायक शासकीय इमारतीं आहेत. महाड शहरात एकूण २६ धोकादायक इमारती असून त्यात २४ खाजगी आणि २ शासकीय इमारती आहेत. अतिधोकादायक श्रेणीत ७ शासकीय इमारतींची नोंद आहे. पालिकेने नगरपरिषद मालकीच्या शाळा, सामाजिक सभागृह व शहरातील इतर इमारतींमध्ये तात्पुरती व्यवस्था केली आहे.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरामध्ये ९ खाजगी इमारती धोकादायक आहेत. अतिधोकादायक श्रेणीत एकूण २५ इमारती असून, त्यात २३ खाजगी व २ शासकीय इमारतीं आहेत. अलिबाग नगरपरिषद प्राथमिक शाळा इमारतीमध्ये स्थलांतराची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. रोहा शहरात २२ धोकादायक इमारती असून त्यात २१ खाजगी व एका शासकीय इमारतीचा समावेश आहे. राेहा पालिकेने नगरपरिषद मंगलवाडी शाळा संकुलात संभाव्य आपत्कालीन परिस्थितकरिता सोय केली आहे.
प्रशासकीय नोटीस आणि पर्यायी व्यवस्था
माणगावमध्ये १९ , श्रीवर्धनमध्ये १५ ,कर्जतमध्ये १०, पालीमध्ये ७ ,खालापूरमध्ये ६ ,माथेरानमध्ये ३, म्हसळा शहरात ४ धोकादायक इमारती आहेत. दरम्यान पोलादपूरमधील ३ धोकादायक इमारती आधीच रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तळा शहरात सध्या एकही धोकादायक इमारत आढळलेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व पालिका व नगरपंचायतींनी आपल्या हद्दीतील अतिधोकादायक व धोकादायक इमारतींना रिकामे करण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. सन २०२६-२०२७ या वर्षासाठी ही कायदेशीर प्रक्रिया ऑनलाईन आणि प्रत्यक्ष स्वरूपात वेगाने राबवली जात आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून बहुतांश ठिकाणी स्थानिक नगरपरिषदेच्या व नगरपंचायतींच्या शाळा, शासकीय किंवा खाजगी महाविद्यालये, सामाजिक सभागृहे आणि सुरक्षित इमारतींमध्ये तात्पुरती निवार्याची सोय निश्चित करण्यात आली आहे. पावसाळ्यातील संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि अतिधोकादायक इमारतींमधून तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.