

Raigad Rains
रोहा (रायगड) : रायगड जिल्ह्यात गेली सहा दिवस मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहे. मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाण्याचा साठा वाढला आहे. जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रात सरासरी ९७.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. रायगड जिल्ह्यातील २८ धरणांपैकी २४ धरणे १०० टक्के म्हणजे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
त्यामुळे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यातील उर्वरित धरणे लवकरात १०० टक्के म्हणजे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. उरण तालुक्यातील पुनाडे सर्वात कमी म्हणजे ५८ टक्के भरले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला २१ ते २४ ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट दिला आहे. अंबा नदीने धोक्याची पातळी तर पाताळगंगा आणि कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.