

माथेरान : मिलिंद कदम
रायगड जिल्ह्यात सलग तीन ेत चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्हयातील पनवेल, रोहा, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा या सहा तालुक्यांमध्ये 200 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पाऊस जागतिक कीर्तीचे पर्यटन असलेल्या माथेरानमध्ये (254 मिमी) झाला आहे. मुसळधार पावसामुळे माथेरानमध्ये मोठी दरड रस्त्यावर आल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातही जीवित व वित्त हानी झाली असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.
तीन दिवसांपासून माथेरानमध्ये पावसाची संततधार सुरू असून काल जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद माथेरानला झाली आहे व आजही सकाळपासून पावसाची संततधर सुरू असून मंगळवारी सकाळी आठवाजेपर्यंत माथेरानमध्ये तब्बल 254.60 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दुपार नंतर पावसाचा जोर वाढला आहे.
अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या व संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या असून नेरळ माथेरान घाटात लहानमोठे दगड पडण्यास सुरवात झाली आहे तर येथील वॉटर पाईप स्टेशन नजीक रस्त्यावर एक भला मोठा दगड येऊन पडल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पावसात ही पर्यटक माथेरानला भेट देत असून सर्वत्र पावसाने हाहाकार माजविला असताना पर्यटकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. माथेरानला दिनांक 19 ऑगस्ट 2025 आतापर्यंत एकूण 3809.20 मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनाच्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नदयाची पातळी इशारास्तरापर्यंत आहे. या नद्यांजवळच्या गावातील प्रशासनाने घेतलेली खबरदारी, पर्यायी व्यवस्था, यंत्रणेची सुसज्जता याची माहिती घेतली.
म्हसळा तालुक्यात 251 मिमी पावसाची नोंद
रायगड : मागील रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडण्याची नोंद म्हसळा तालुक्यात होत असते. दोन दिवसांत 358 मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये 17 रोजी 143 मी.मी. तर 18 रोजी सकाळी 8 ते पाच वाजेपर्यंत 215 मी.मी.इतका पाऊस झाला असल्याचे सांगण्यात आले. म्हसळा तालुक्यात एकुण 4095 मी.मी.पाऊस पडला आहे.
जिल्ह्यातील पनवेल, रोहा, माणगाव, तळा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्येही दोनशे मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर अलिबाग आणि पेण तालुक्यामध्ये 190 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. यामुळे या आठ तालुक्यांमधील नद्या-नाल्यांच्या परिसरात पूरसदृष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे. पनवेल तालुक्यात सुमारे चारशे नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.
म्हसळा तालुक्यातील पांगलोळी गावातील सखल भागात पावसाचे व नदी खाडीचे पाणी साचले असल्याने जाण्या येण्याचा मार्ग बंद झाला होता. माणगाव तालुक्यातील नद्यांची पाणी वाढून पूलावर पाणी आल्याने वाहूतक बंद करण्यात आली होती.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दरडप्रवण, पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. सर्व शासकीय विभागप्रमुखांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या सूचनेनुसार आपापसात योग्य समन्वय ठेवून अलर्ट मोडवर काम करावे. योग्य नियोजन करून उपाययोजना कराव्यात. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
किशन जावळे जिल्हाधिकारी, रायगड