महाड : किरीट सोमय्यांना स्थानिक पत्रकारांचे वावडे : पदाधिकाऱ्यांनाही झापले | पुढारी

महाड : किरीट सोमय्यांना स्थानिक पत्रकारांचे वावडे : पदाधिकाऱ्यांनाही झापले

महाड, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाड येथील स्थानिक पत्रकारांबरोबर बोलण्यास नकार दिला आहे. आपल्या सोबत आलेल्या मुंबईतील मीडिया बरोबरच बोलणार, तेदेखील जेवण करतानाच बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्यांच्यासमवेत असणारे भाजपचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी यांना देखील बाहेर काढण्याचा प्रकार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. या पवित्र्यामुळे पदाधिकारी अवाक होत संतप्त प्रतिक्रिया देत होते.

दापोली येथे जाण्यासाठी महाड येथे थांबलेल्या किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) स्थानिक पत्रकारांनी भेट मागितली. पत्रकारांबरोबर बोलणार असे सांगितले. परंतु प्रत्यक्ष पत्रकार जेव्हा भेटण्यासाठी गेले, तेव्हा मात्र किरीट सोमय्या यांची जीभ घसरली. मी स्थानिक पत्रकारांबरोबर बोलणार नाही केवळ मुंबईतून आलेल्या मीडियाबरोबरच वार्तालाप करणार असल्याचे सांगत स्थानिक पत्रकारांना वार्तालापाच्या ठिकाणावरून बाहेर काढले.

एवढ्यावरच किरीट सोमय्या थांबले नाहीत. तर त्यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांना झापले. जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्या समक्ष जिल्ह्याचे सरचिटणीस, महिला आघाडी प्रमुख, तालुका प्रमुख आदी पदाधिकाऱ्यांना देखील वार्तालापाच्या ठिकाणावरून बाहेर काढले. यामुळे आपल्याच नेत्याच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदवला. जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी याबाबत पदाधिकारी आणि पत्रकारांची दिलगिरी व्यक्त केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button