

हिंजवडी : महसूल विभागाच्यावतीने नागरिकांना एकाच छताखाली विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी आयोजित महाराजस्व अभियानात 150 जणांनी लाभ घेतला. हिंजवडी येथे आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच दिवशी एकाच ठिकाणी थेरगाव विभागात येणार्या 18 गावांमधील एकूण 554 लाभार्थ्यांपैकी सुमारे 150 लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ मिळाला.
दाखले एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासनाच्यावतीने मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण व थेरगावचे मंडलाधिकारी हेमंत नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय विशेष शिबिर हिंजवडी आयटीनगरीमध्ये आयोजित केले होते. या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार्या अनुदानासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे व अन्य दाखल्याचे वाटप करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी हिंजवडीच्या प्रभारी सरपंच शिवानी जांभुळकर, तलाठी संघटनेच्या अध्यक्षा वर्षा वाडेकर, तलाठी सागर शेलार, माणचे तलाठी संदीप गायकवाड, अशोक आमोदे व हनुमंत चांदेकर यांच्यासह अन्य तलाठी उपस्थित होते. थेरगाव मंडल कार्यालयाच्या कक्षेत येणार्या, हिंजवडी, वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, जांबे, नेरे, कासारसाई, मारुंजी, माण, चांदे, नांदे, सुस, म्हाळुंगे आशा तब्बल 18 गावातील लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात अपंगत्व आलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ निराधार नागरिक, विधवा महिला, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती मतिमंद तसेच निराधार महिलांना दरमहा मिळणारे शासकीय अनुदान मिळण्यासाठी प्रशासनाने उत्पन्नाचा दाखला अनिवार्य केला आहे. त्यामुळे आवश्यक दाखले मिळविण्यासाठी तलाठी, महा ई सेवा केंद्र, तहसील कार्यालय, मंडल अधिकारी व पुन्हा तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. 31 जुलैपर्यंत दाखले दाखल करायचे असल्याने नागरिकांना एकाच छताखाली दाखले मिळावेत यासाठी हे शिबिर आयोजित केले होते.