पुणे : पुढारी वृत्तसेवा:
जिल्ह्यात 'हर घर दस्तक' मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. 'कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 'हर घर दस्तक' मोहीम 31 जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे,' अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावावर 'हर घर दस्तक' मोहीम टप्पा क्र.2 पुन्हा राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने घेतला आहे. लसीकरण न झालेल्या नागरिकांचे त्याअंतर्गत घरोघरी जाऊन समुपदेशन करण्यात येणार आहे. मास्क सक्ती नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून या संक्रमण काळात नियमित मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगवर भर देणे, सॅनिटायजरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात अधिकाधिक क्षमतेने सर्वेक्षण, आरोग्य तपासणी आणि समुपदेशन राबविण्यात येणार आहे. आगामी आषाढीवारीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी योग्य काळजी घ्यावी व कोरोनाची पुन्हा लाट येऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करून कोरोना लस प्राधान्याने घ्यावी.
डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद