हडपसर; पुढारी वृत्तसेवा: कोरोना संकटानंतर या वर्षी निर्बंधविरहित गणेशोत्सव साजरा केला जात आहे. असे असले तरी नैसर्गिक विसर्जन स्थळांवर म्हणजे हडपसरमधून वाहणारा नवीन कालवा, तसेच मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदीपात्र येथे नागरिकांनी थेट गणेश विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुमारे 36 ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, 15 फिरते विसर्जन हौद यांची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे.
नवीन कालवा आणि मांजरी बुद्रुक येथील मुळा- मुठा नदी ही या परिसरातील नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. गेली अनेक वर्षे येथे नागरिक गणेश विसर्जन करीत होते. मात्र ,गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी गणेश विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याही वर्षी महापालिकेने येथे गणेश विसर्जन न करण्याचे आवाहन केले आहे. कालवा परिसर आणि नदीच्या काठावर असलेल्या विसर्जन घाटांवर बांबू, तसेच बॅरिकेट्स बांधण्यात येणार आहेत .त्यामुळे नागरिकांना त्यांच्या जवळ असलेल्या महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रात गणेशमूर्ती द्यावी लागणार आहे. प्रत्येक प्रभागात किमान 7-8 मूर्ती संकलन केंद्रे सुरू केली आहेत.
प्रभाग क्रमांक 22,23,26 आणि 42, तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांत 36 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे 15 फिरते हौद तयार असून, प्रत्येक आरोग्य कोठीकडून तो फिरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 36 मोबाईल टॉयलेट, 12 जीवरक्षक व 251 स्वच्छता कर्मचारी व मदतनीस यांची गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी नेमणूक करण्यात आली आहे.
नवीन समाविष्ट गावांत येथे सोय
ग्रामपंचायत कार्यालय हांडेवाडी, ग्रामपंचायत कार्यालय होळकरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळेवाडी, ए. एम. कॉलेज महादेनगर, राम मंदिर मांजरी फार्म, पी.एम.आर.डी प्लॉट शेवाळेवाडी फाटा, ग्रामपंचायत कार्यालय मांजरी बुद्रुक, जिल्हा परिषद शाळा म्हसोबा वस्ती मांजरी बुद्रुक.
विसर्जनापूर्वीची पूजा, आरती आणि इतर विधी घरीच पूर्ण करावेत, ज्यामुळे मूर्ती संकलनस्थळी गर्दी टाळता येईल. कालवा व नदीत गणेशमूर्ती विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गणेशभक्तांना फिरते विसर्जन हौद आहेत, तेथे मूर्ती विसर्जित करता येईल. नागरिकांनी कोणत्याही नैसर्गिक गणेश विसर्जन स्थळांवर न जाता मूर्ती संकलन केंद्रावर जाऊन मूर्ती द्याव्यात.
– प्रसाद काटकर, सहायक आयुक्त ,हडपसर- मुंढवा.
नागरिकांना येथे देता येईल गणेशमूर्ती आणि निर्माल्य
प्रभाग क्रमांक -22 : मुंढवा भाजी मंडई, राजेश्री शाहू शाळा मुंढवा, मगरपट्टा सिटी कै. लक्ष्मीबाई मगर शाळा क्र.77.बी, भोसले गार्डन हडपसर, पवार शाळा विठ्ठलनगर, आकाशवाणी आरोग्य कोठी पाण्याची टाकी, न्यू इंग्लिश स्कूल डी पी रोड माळवाडी.
प्रभाग क्रमांक -23 : मनपा शाळा क्र.32 हडपसर गाव, महात्मा फुले क्रीडा संकुल, हिंगणे मळा, बंटर शाळा गाडीतळ हडपसर, गोंधळेनगर भाजी मंडई समोर, मारुतराव काळे शाळा काळेपडळ, हनुमान बाल उद्यान तुकाई टेकडी.
प्रभाग क्रमांक -26 : सदाशिवनगर हंडेवाडी रोड, महमंदवाडी हडपसर, गावठाण शाळा लोणकर गार्डन कौसर बाग कोंढवा, दशक्रिया विधी घाट कोंढवा.
प्रभाग क्रमांक -42 : महादेव मंदिरलगत केशवनगर कुंभारवाडा, जिल्हा परिषद शाळा साडेसतरानळी, बेंदवाडी पुलाजवळ फुरसुंगी, शिवशक्ती चौक- गंगानगर रिक्षा स्टँड मनपा संपर्क कार्यालय फुरसुंगी, गंगानगर महात्मा फुले वसाहत फुरसुंगी, संजूदा कॉम्प्लेक्स जवळ पापडे वस्ती, भेकराईनगर आरोग्य कोठी.