हडपसर-सासवड रस्ता व्यापला खड्ड्यांनी

हडपसर-सासवड रस्ता व्यापला खड्ड्यांनी

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : हडपसर-सासवड रस्त्यावर तुकाईदर्शन चौकापासून उरुळी देवाची पोलिस चौकीपर्यंत खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे अपघाताबरोबरच सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. पालखी येण्यापूर्वी प्रशासनाने केलेल्या रस्तेदुरुस्तीची पोलखोल नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने केली असून, या मार्गावर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडले आहेत.

खड्ड्यांमध्ये पाणी साठत आहे. त्यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी वाहने जोरात आदळत आहेत. वाहनांचे नुकसान होत आहे, वाहने बंद पडत आहेत. दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहेत. वाढत्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

शहरातील अवजड वाहतूक यामार्गे पुढे वळविण्यात आल्याने तुकाईदर्शन चौकापासून मंतरवाडी चौकापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्‍या बस, रहिवाशांची वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे इंधन व वेळेचा तोटा होत असल्याने येथील रहिवासी रोजच्या या वाहतूक कोंडीला अक्षरश: वैतागले आहेत.

पुणे-सासवड रस्त्याने प्रवास? नको रे बाबा… !
आज सकाळच्या सुमारास मुलीला शाळेत सोडवायला जाताना डंपरची धडक बसल्याने दुचाकीवरील बाप-लेकीचा करुण अंत झाला. या मार्गावर सातत्याने अपघात होत असून, प्रशासन मात्र ढिम्म आहे. त्यामुळे हडपसर-सासवड रस्ता व मंतरवाडी-कात्रज रस्ता हे वाहतूक कोंडी आणि अपघातासाठी जिल्ह्यात कुप्रसिद्ध ठरत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news