स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होतोय … अरे आता तरी आमच्याकडे कुणी लक्ष द्या?

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होतोय … अरे आता तरी आमच्याकडे कुणी लक्ष द्या?
Published on
Updated on

लोणावळा : एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. तर, दुसरीकडे लोणावळा परिसरातील अनेक गावं, वाड्या-वस्त्यांवर रस्ता, पाणी, शाळा, आरोग्यसुविधा पोहोचलेल्या नाहीत. आजही नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीचा लाभ खर्‍या अर्थाने आपल्या देशाच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या आदिम आणि मागासवर्गापर्यंत पोहोचला आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई-पुणे या दोन विकसित महानगराच्या बरोबर मधोमध असणार्‍या जगप्रसिद्ध पर्यटननगरी लोणावळा शहरापासून केवळ 16 किलोमीटर अंतरावर असलेले राजमाची, उधेवाडी हे गाव आणि येथील ग्रामस्थांसाठी परिस्थिती काही वेगळी नाही.

हजारो पर्यटकांची पावसाळ्यात हजेरी
राजमाची गावातील नागरिक आजही रस्ता, लाईट, पाणी या मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बाकेकिल्ले याच ठिकाणी आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक व ट्रेकर्स याठिकाणी येत असतात. अगदी लोकप्रतिनिधी व मंत्रालयातील अधिकारी मंडळी या भागात निवांतपणा शोधण्यासाठी येत असतात. असे हे दोनशे ते अडीचशे लोकसंख्या असलेले गाव देश स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून झगडत आहे.

रस्ता, पाण्याचा अभाव
याठिकाणी येणारे पर्यटक हे येथील ग्रामस्थांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. गावातील तरुण मुलं लोणावळा शहरात बंगल्यांवर काम करतात, तर वयस्कर मंडळी गावात पर्यटकांची उठबस पाहतात. लोणावळा शहरापासून 16 किमी अंतरावर असलेल्या राजमाची गावात जाण्यासाठी आजदेखील पक्का रस्ता नाही. वनविभाग रस्ता बनविण्यासाठी परवानगी देत नाही, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, गाव तेथे रस्ता व एसटी हे स्वप्न पाहणार्‍या महाराष्ट्र शासनाला हे गाव आपल्या राज्यात आहे याचाच विसर पडला आहे. गाव कोठेही असो, त्याला रस्ता, पाणी, वीज या मूलभूत सुविधा मिळणे हा त्या नागरिकांचा कायदेशीर अधिकार असताना वरील तिन्ही सुविधा येथे उपलब्ध नाहीत.

गाव आजही अंधारात
राजमाची गाव आजही अंधारात आहे. सोलर लाईट व इतर साधनांचा वापर येथे दिवे लावण्यासाठी केला जातो. गावात कोठेही बोअरला पाणी लागत नाही. किल्ल्याच्या अर्ध भागात असलेल्या एका टाकळीमधून गावाची तहान भागवली जाते. कपडे धुणे व इतर कामासाठी गावाच्या खालील बाजूला असलेल्या तळ्यावरून पाणी आणले जाते. मागील वर्षी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गावाच्या जवळ पाणी खेचून आणण्याची सोय करण्यात आली आहे. मागील 75 वर्षांत अनेक सामाजिक संघटना व संस्थांनी या गावात श्रमदान व मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून ग्रामस्थांना मदतीचा हात दिला. मात्र, मायबाप सरकार येथपर्यंत पोहोचलं नाही, ही येथील नागरिकांची खंत आहे.

प्रशासनाचे सुविधांकडे दुर्लक्ष
दर शनिवार व रविवारी गावात किमान एक हजाराहून अधिक पर्यटक येत असतात. यामध्ये अनेक शासकीय अधिकारी व पदाधिकारीदेखील असतात. गावात येण्यासाठी रस्ता नसतानादेखील सात ते आठ किमी चिखल तुडवत गावात व राजमाची किल्ला परिसर पाहण्यासाठी पर्यटक येतात. पर्यटकांकडून कर वसूल केला जातो. मात्र, सुविधा काही दिल्या जात नाहीत. त्यामुळे किमान आम्हाला रस्ता, पाणी, लाईट सुविधा द्या, अशी आर्त भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news