जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर परिसरात शेतकर्यांच्या सोयाबीन व गव्हाची चोरी करणार्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीकडून तब्बल 5 हजार 650 किलो वजनाचे 113 सोयाबीन कट्टे व 8 गव्हाच्या कट्ट्यांसह 8 लाख 79 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी 6 जणांना अटक केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. नीलेश लक्ष्मण केवळ, साईनाथ विलास केवळ, रवींद्र गोरक्ष केवळ, राजेंद्र रामदास केवळ (सर्व. रा. निमदरी, ता. जुन्नर) तसेच सुनील मोहन काळे आणि रविराज विजय मोधे (दोघे रा. कुसुर, तलाखी, ता. जुन्नर) अशी चोरट्यांची नावे आहेत.
जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांच्या सोयाबीन, गहू तसेच शेती साहित्याच्या चोरीप्रकरणी जुन्नर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. गणेश केदार (रा. घोडेगाव फाटा, ता. जुन्नर) यांनीदेखील 24 मार्चला त्यांच्या वडगाव साहनी येथील फार्म हाऊसमधून सोयाबीनचे 35 कट्टे चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरू होता. हे गुन्हे नीलेश केवळ, साईनाथ केवळ यांनी साथीदारांच्या मदतीने केल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. तसेच हे सर्व जण त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडीने सोयाबीन विक्री करण्यासाठी घोडेगाव फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पिकअपसह संशयितांना ताब्यात घेतले.
हेही वाचा