टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : लग्न समारंभासाठी या वर्षी ठरावीकच मुहूर्त असल्याने एकाच दिवशी अनेक ठिकाणी विवाह सोहळे होत आहेत. याचदरम्यान लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे नेतेमंडळींची जास्तीत जास्त ठिकाणी हजेरी लावण्यासाठी लगबग पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी साखरपुड्याला, काही ठिकाणी हळदीला, तर काही ठिकाणी लग्न समारंभाला हजेरी लावताना मात्र नेत्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे शुभेच्छा घ्या आणि मला मतदानरूपी आशीर्वाद द्या, असे साकडे हे उमेदवार या सोहळ्यात मतदारांना घालताना दिसत आहेत.
शिरूर लोकसभेचे उमेदवारदेखील आता यामध्ये मागे नाहीत. उमेदवारांचे कार्यकर्ते त्यांना लग्न समारंभास उपस्थित राहण्यासाठी आग्रह करत आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी शक्य असेल तिथे हजेरी लावताना त्यांची पुरती दमछाक होत आहे. वधू-वरांना शुभेछा देताना स्वतःसाठी मतदानरूपी आशीर्वाद देण्याची साद घातली जात आहे. एरवी वधू-वरांना आशीर्वाद देताना त्यांच्या सुखसमाधानाबद्दल बोलणारी नेतेमंडळी आता मात्र त्यांच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करण्यासाठीच जास्त वेळ घेत असल्याची उपस्थितांमध्ये चर्चा रंगत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांतील नेतेमंडळी जसे सर्वसामान्यांच्या लग्न सोहळ्यासाठी हजेरी लावतात, तसे नंतरही लावतील का, हा प्रश्न मात्र यामुळे उपस्थित होत आहे.
इतर वेळी कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या नेत्यांच्या वतीने शुभाशीर्वाद देत होते; मात्र आता सर्वपक्षीय नेते एकत्र असताना युती-आघाडीमुळे उमेदवाराला आशीर्वाद मागितला जातो. वर-वधूने कसे आयुष्य जगावे, यापेक्षा आम्ही कोणती विकासकामे करणार हे सांगितले जात असल्याने विवाह सोहळा हा धार्मिक विधी राजकीय वळणावर येऊन पोहोचल्याची कुजबूज ऐकावयास मिळत आहे.
हेही वाचा