

शिरगाव : सोमाटणे येथील टोल नाक्याजवळ वेश्या व्यवसाय चालत असल्याने, या परिसरातून ये-जा करणार्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे.
घोरावडेश्वर मंदिर ते तळेगाव खिंड या रस्त्यावर या देहविक्री व्यवसाय करणार्या काही महिला तसेच काही तृतीयपंथीत या परिसरात उभे राहून येथून ये-जा करणार्या नागरिकांना खुणावतात.
या भागात शाळा असल्याने येथे येणार्या पालकांना विशेषत: महिलांना त्रास सहन करावा लागतो. देहविक्री व्यवसाय करणार्या काही महिला दुचाकी वरून जाणार्यांना बोलावण्यासाठी इशारे करतात. या संदर्भात तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लांडगे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, आम्ही वेळोवेळी या महिलांवर कारवाई करत असतो. अद्याप असे प्रकार घडत असतील, तर आम्ही निश्चितपणे संबंधितांवर कारवाई करू.