‘सेट’ आता थेट डिसेंबरमध्येच; ‘यूजीसी’च्या समितीने पाहणी केल्यानंतरच निर्णय
पुणे : पुढारी वृत्तसेवा: विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) एक समिती येऊन परीक्षा योग्य पद्धतीने होते का? याची खात्री करणार आहे. त्यानंतरच राज्य पात्रता परीक्षा अर्थात 'सेट' घेता येणार आहे. परिणामी ही परीक्षा डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता असल्याचे 'सेट' विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत गोवा आणि महाराष्ट्रात घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा अर्थात 'सेट' जून-जुलै महिन्यात होणे अपेक्षित होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएव्दारे राष्ट्रीय चाचणी परीक्षा अर्थात 'नेट'चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, संबंधित परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून घेण्यात येणारी 'सेट' नेमकी कधी होणार, असा प्रश्न आता विद्यार्थी विचारत आहेत. यासंदर्भात विद्यापीठातील अधिकार्यांकडे विचारणा केली असता अधिकार्यांनी 'सेट'च्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार यूजीसीकडून 'सेट' आयोजनासंदर्भात तीन वर्षांची मुदत देण्यात येत असते. त्यानुसार पुणे विद्यापीठाकडून तीन परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. आता पुन्हा परीक्षा घ्यायची असेल, तर यूजीसीकडे तसा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच पुन्हा विद्यापीठाला 'सेट' घेता येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव यूजीसीकडे पाठविला आहे. यूजीसीची एक समिती पाहणी केल्यानंतर विद्यापीठाचा सेट विभाग 'सेट'चे पेपर सेट करेल. यासाठी साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले.
आयोजनाची जबाबदारी कोणाकडे?
'सेट'च्या आयोजनाची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे आहे. परंतु, राजकीय हालचाली होऊन संबंधित आयोजनामध्ये बदल करून याची जबाबदारी दुसर्या विद्यापीठाकडेदेखील दिली जाऊ शकते. त्यामुळे बदल होऊन दुसर्या विद्यापीठाला जबाबदारी मिळणार की संबंधित जबाबदारी पुणे विद्यापीठाकडेच राहणार, याकडे विद्यापीठातील अधिकार्यांसह विद्यार्थ्यांचेदेखील लक्ष लागले आहे.

