पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) येथील सौरशास्त्रज्ञांच्या चमूने सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील मिरकॅट रेडिओ दुर्बिणीचा वापर करत सूर्याची रेडिओ प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे सूर्याची अभूतपूर्व वैशिष्ट्ये दिसून आली आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या कारू वाळवंटात उभारलेले मिरकॅट रेडिओ दूरदर्शक संकुल आहे. या संकुलात आठ किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात 13.5 मीटर व्यासाचे 64 रेडिओ दूरदर्शक उभारले आहेत. हे दूरदर्शक गिगाहर्ट्झ कंपन संख्येच्या रेडिओ लहरींचे निरीक्षण करतात. या वर्णपटात सूर्याची निरीक्षणे करत अत्यंत कमी वेळेत प्रतिमा निर्माण करणारी ही जगातील सर्वोत्तम दूरदर्शक सुविधा मानली गेली आहे.
या संशोधनातील प्रमुख वैज्ञानिक डॉ. कंसाबनिक म्हणतात, सूर्य हा अभ्यास करण्यासाठी आव्हानात्मक आहे. रेडिओ उत्सर्जन सूर्याच्या क्षीण वातावरणातून उद्घवते. सूर्याचा हा प्रदेश कोरोना म्हणून ओळखला जातो. संपूर्ण ग्रहणाच्या वेळीच उघड्या डोळ्यांनी दिसतो. कोरोना पर्यावरणावर परिणाम करतो.
वैज्ञानिक डॉ. मोंडल म्हणतात, सूर्याचे चित्र काढण्यासाठी अनेक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यातील एक म्हणजे सूर्याचे रेडिओ उत्सर्जन होय. ते एका तरंग लांबीपासून जवळच्या तरंग लांबीमध्ये नाट्यमयरीत्या बदलू शकते. रेडिओ तरंग लांबीवरील सूर्य एका सेकंदापेक्षा कमी वेळात आणि जवळच्या समान रंगाच्या छटांमध्येही खूप वेगळा दिसू शकतो.
हेही वाचा