दापोडी : सिग्नलचा खेळखंडोबा ! नवी सांगवीत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे गणेशभक्त त्रस्त

दापोडी : सिग्नलचा खेळखंडोबा ! नवी सांगवीत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे गणेशभक्त त्रस्त

दापोडी : पुढारी वृत्तसेवा :  नवी सांगवीतील कृष्णा चौकात ऐन गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक विभागाचे वाहतूक नियंत्रक सिग्नल बंद असल्याने वाहतुकीचा खेळ खंडोबा होत आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. कृष्णा चौक हा सांगवी परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेला गजबजलेला भाग आहे. या चौकामध्ये सांगवीकडून पिंपळे गुरवकडे, तसेच शिवनेरी चौक व एमएस काटे चौक आदी भागातून दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते.

कृष्णा चौकातील स्मार्ट सिटीचे काम पूर्ण झाले आहे. काम पुर्ण झाले असले तरी काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे आजही खोदकाम सुरूच आहे. त्यामुळे चौकामध्ये राडारोड्याचे ढिग दिसून येत आहेत. चौकामध्ये सोयीसुविधा असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती झाली आहे.

सायंकाळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. त्यातच वाहनांची वर्दळ असते. काही टवाळखोर वाहन चालक सुसाट वेगाने गर्दीच्या बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे छोटे मोठे अपघात नित्याने होत आहेत.
ऐन सणासुदीच्या काळात वाहतूक सिग्नल बंद असल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. सबंधित वाहतूक विभागाच्या प्रशासनाने लक्ष घालून बंद असलेले वाहतूक नियंत्रक दिवे दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

गणपती विसर्जन एक दिवसावर येऊन ठेपले आहे. खोदकामाचा सपाटा सुरूच आहे. स्मार्ट सिटीच्या कामासाठी महापालिकेच्या वतीने अभियंता व सल्लागार नेमले आहेत. चौकातील रस्त्याचे नियोजनशून्य काम आहे. सल्लागारांनाच माहीत नाही की काम पूर्ण झाले की नाही. गेल्या दीड वर्षापासून एकाच जागेवर खोदकाम सुरू आहे.
– शिवाजी पाडुळे, नवी सांगवी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news