

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा वाद आता न्यायालयात गेला आहे. ही निवड प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू होणे अपेक्षित असताना, सरकारच्या अनास्थेमुळे ही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर 17 मे रोजी निवृत्त झाले. मात्र, नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी समितीची स्थापना करण्यात आलेली नाही.
नव्या कुलगुरूंची निवड करण्यासाठी राज्यपालांकडून समिती स्थापन होणे गरजेचे असते. या समितीमध्ये पुणे विद्यापीठ, राज्यपाल आणि सरकारकडून प्रत्येकी एक सदस्य असतो. या प्रक्रियेला विलंब होऊ नये, यासाठी पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून सदस्याची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठ कायद्यातील सुधारणांमुळे राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सदस्याची नेमणूक करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले आहे.
समितीसाठी आवश्यक सदस्य उपलब्ध होत नसल्याने राज्यपाल कार्यालयाकडून समिती जाहीर करण्यात अडचणी येत आहेत. पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे मोठे असल्याने, विद्यापीठाचा कारभार हा प्रभारी कुलगुरूंद्वारे चालविणे अवघड असल्याचे मत भूमिका कुलकर्णी यांनी मांडले आहे.
सध्याच्या 2016 च्या विद्यापीठ कायद्याप्रमाणे कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा. विद्यापीठात विविध निवडणुका होत आहेत. त्यामुळे विद्यापीठात त्वरित पूर्णवेळ कुलगुरू नियुक्त होण्याची आवश्यकता आहे.
– धनंजय कुलकर्णी, माजी सिनेट सदस्य आणि याचिकाकर्ते.
हेही वाचा