सारे पुणे शहर खड्ड्यात; प्रशासनाच्या कामाचे पितळ उघडे, चेंबरही खचले

सारे पुणे शहर खड्ड्यात; प्रशासनाच्या कामाचे पितळ उघडे, चेंबरही खचले
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणार्‍या पावसामुळे रस्ता दुरुस्तीचे पितळ उघडे पडले आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढताना गुरुवारी वाहनचालकांच्या नाकीनऊ आले. दरम्यान, काही ठिकाणी चेंबरदेखील खचले आहेत. महापालिकेकडून पावसाळीपूर्व कामांसाठी म्हणून लाखो रुपयांची उधळण होते. यंदा पालिकेवर प्रशासकीय राज असले तरी नेहमीप्रमाणे यंदाही निकृष्ट दर्जाच्या पावसाळीपूर्व कामाचा अनुभव पुणेकरांना येत आहे.

शहरातील मध्यवस्तीतील रस्त्यांसह उपनगरीय भागातील रस्त्यांवरही खड्डे पाहायला मिळत आहेत. परिणामी, या खड्ड्यांमधून जाताना वाहनचालकांचे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, या खड्ड्यांमुळे शहरातील वाहतुकीवरदेखील मोठा परिणाम झाला असून, रस्त्यांवरील वाहतूक मंदावली आहे. अगोदरच सातत्याने बरसणारा पाऊस आणि आता त्यातच खड्ड्यांची भर यामुळे पुणेकर वाहनचालक हैराण झाले आहेत.

नदीपात्रातील रस्ता उखडला
बुधवारी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे येथील नदीपात्रालगत असलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यावरून प्रशासनाने तयार केलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहायला मिळत आहे.

वाहतूक मंदावली
शि. प्र. मंडळी शाळेच्या समोरून सदाशिव पेठेत जाणार्‍या रस्त्यावरसुद्धा ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर नवी पेठेतील गांजवे चौक, यासोबतच शास्त्री रस्त्यावर, हत्ती गणपती मंडळासमोरील बाजूस, टिळक रस्त्यावरसुद्धा अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक मंदावली आहे, तर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.

रस्ता आहे कुठे…
शिवाजीनगर येथील पूर्वीच्या कामगार पुतळा वसाहतीसमोरील रस्त्यावर तर मोठे खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढताना चालकांच्या नाकीनऊ येत आहेत, तर आरटीओसमोरून जहांगीर रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरदेखील काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच, पुणे स्टेशन भागातील रस्त्यांवरसुद्धा खड्डे पडल्याचे पाहायला मिळाले.

उपनगरातही बोंब
शहराचा उपनगरीय भाग असलेल्या कात्रज, धनकवडी, अप्पर-इंदिरानगर, बालाजीनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, स्वारगेट, धायरी, वडगाव, कोथरूड, येरवडा, खडकी, हडपसर यांसारख्या अनेक ठिकाणी या पावसामुळे खड्डे पडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news