पुणे; पुढारी वृत्तसेवा: लसीकरणाचा वेग वाढावा आणि कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी महापालिकेतर्फे 'व्हॅक्सिन ऑन व्हील्स' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत 4 लाख 49 हजार 843 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. दिव्यांग, तृतीयपंथी, बांधकाम मजूर, अंथरुणाला खिळलेल्या व्यक्ती आदींचा लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे. मागील वर्षी 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. कोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने सर्व नागारिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
लसीकरणाच्या मोहिमेत 'व्हॅक्सिन ऑन व्हील'अंतर्गत सामाजिक संस्था, वृद्ध व्यक्ती, विशेष घटक, सुपर स्प्रेडर, अंथरुणाला खिळलेल्या व्यक्ती, झोपडपट्टी क्षेत्र, शासकीय कार्यालयांमधील व्यक्ती, परदेशात शिक्षणासाठी जाणार्या व्यक्ती, कलाकार आदींचे लसीकरण पार पडले. महापालिकेकडे लसीकरण मोहिमेअंतर्गत एकूण 3 हजार 153 संस्थांनी अर्ज केला होता. यामध्ये 6756 दिव्यांग व्यक्ती, वृद्धाश्रमांमधील 3460 ज्येष्ठ व्यक्ती, 308 तृतीयपंथी, 2605 देवदासी, 528 घरेलू कामगार, 28 हजार घरेलू कामगार महिला, 34 हजार बांधकाम मजूर, 23 हजार फेरीवाले, 2 लाख 59 हजार झोपडपट्टीतील नागरिक आदींचा समावेश आहे.
विशेष मोहिमेअंतर्गत परदेशी जाणारे 10 हजार विद्यार्थी, शाळांमध्ये झालेल्या मोहिमेमध्ये 12 ते 14 वर्षे वयोगटातील 9280, 15 ते 18 वर्षे वयोगटातील 25 हजार 581 विद्यार्थी, 650 कलाकार, सोसायट्यांमधील 3608 सदस्य यांचे लसीकरण पार पडले. यासाठी महापालिकेतर्फे कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, कॉर्बेव्हॅक्स लसी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये बुस्टर डोसचाही समावेश असल्याचे, महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.
दुसरा डोस आणि बुस्टर डोस
राहिलेल्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, यासाठी महापालिकेतर्फे 'हर घर दस्तक' मोहीम राबवण्यात येत आहे. 'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत 1 जून ते 31 जुलै या कालावधीत घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत जून महिन्यात 15 हजार जणांना लस देण्यात आली आहे. तब्बल 10 लाख नागरिकांना एसएमएस पाठवण्यात आले आहेत.– डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका