

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील जलतरणपटू सागर कांबळे याने भारतीयांची मान उंचावण्याची कामगिरी करीत अवघ्या 14 तास 48 मिनिटांत जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी (34 किलोमीटर अंतर) चौदा अंश सेल्सिअस तापमानात पार केली. याबाबत जलतरणपटू सागर कांबळे म्हणाला, 'शालेय जीवनापासूनच पोहण्याची आवड निर्माण झाली. यातूनच अनेक शाळा, महाविद्यालयांच्या जलतरण स्पर्धा गाजवल्या. मात्र, इंग्लिश खाडी सतत खुणावत होती. इंग्लंडचा दक्षिण किनारा व फ्रान्सचा उत्तर किनारा यामधील अटलांटिकचा भाग इंग्लिश खाडी म्हणून ओळखला जातो. ही खाडी अत्यंत कमी तापमानात सर करणे मोठे आव्हानात्मक होते. अखेर अवघ्या 14 तास 48 मिनिटांत ही खाडी सर करण्यात यश मिळाले.'
सागर काळेवाडी येथे वास्तव्यास आहे. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्याला जलतरणाचे वेड लागले. तेव्हापासून अनेक शालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने चमकदार कामगिरी केली. 2015 मध्ये चंडीगड येथे झालेल्या अखिल भारतीस आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्याने 4 बाय 200 मीटर रिले प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. त्याच वर्षी झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत सागरने 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. 2014 मध्ये झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत 200 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. सागरचे प्रशिक्षक असलेले अमोल आढाव यांच्या रूपात पिंपरी-चिंचवडमधील एकमेव जलतरणपटूने आतापर्यंत इंग्लिश खाडी सर केली आहे. सागरचे वडील स्नॅक सेंटर चालवतात. अशा बेताच्या आर्थिक परिस्थितीत त्याने हे उत्तुंग यश संपादित केले आहे.