साखर उत्पादनात भारताचे अग्रस्थान; राज्यात 138 टन उच्चांकी उत्पादन

साखर उत्पादनात भारताचे अग्रस्थान; राज्यात 138 टन उच्चांकी उत्पादन
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जगात साखर उत्पादनात भारताने मुसंडी मारत सुमारे 357 लाख टन उत्पादन घेतले असून, 330 लाख टन साखर उत्पादनासह ब्राझील दुसर्‍या स्थानावर आला आहे. चीन, रशिया, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांनाही मागे टाकत आणि तब्बल 138 लाख टनाइतके विक्रमी साखर उत्पादन तयार करीत महाराष्ट्र हे पहिले ऊस उत्पादक राज्य ठरल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

राज्यात 2021-22 या हंगामातील संपूर्ण उसाचे गाळप 15 जूनअखेर पूर्ण झाले असून, ऊस शिल्लक असल्याची कोणतीही तक्रार आयुक्तालयाकडे नाही. तसेच 2022-23 या आगामी हंगामातही राज्यात उसाचे क्षेत्र निश्चित वाढणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. साखर संकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी साखर सह संचालक (विकास) पांडुरंग शेळके उपस्थित होते.

ते म्हणाले, 'राज्यात 2021-22 या हंगामात 1320 लाख मेट्रिक टन इतके विक्रमी ऊस गाळप होऊन 10. 40 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 138 लाख मेट्रिक टनाइतके उच्चांकी साखर उत्पादन झाले आहे. त्यातून शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर एफआरपीचे 37 हजार 712 कोटी रुपये म्हणजे देय रकमेच्या 95.28 टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. एकूण हंगामाचे दिवस पाहता जास्तीत जास्त 240 दिवस, सरासरी गाळप दिवस 173, तर कमीत कमी ऊस गाळप दिवस 36 राहिले आहे.'

माढा येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने सर्वाधिक 24 लाख 78 हजार 922 मेट्रिक टन ऊस गाळप, 23 लाख 45 हजार क्विंटलइतके उच्चांकी साखर उत्पादन घेतले. सर्वाधिक 12.99 टक्के साखर उतारा कोल्हापूरमधील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने मिळवित अग्रक्रम पटकाविला. सर्वांत कमी ऊस गाळप सातारामधील किसन वीर सहकारी साखर कारखान्याने केले असून, ते 18 हजार 219 मेट्रिक टन आहे. प्रति टनास 3133.45 रुपयांइतका सर्वाधिक ऊस दर कोल्हापूरमधील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारीने दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील वर्षी कारखान्यांच्या 1 लाख 37 हजार मेट्रिक टनांच्या दैनिक ऊस गाळप क्षमता वाढीस शासनाने मान्यता दिली आहे. एफआरपी थकीतप्रकरणी बीडमधील वैद्यनाथ, अंबाजोगाई, सोलापूरमधील सहकार शिरोमणी वसंतराव काळे आणि पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश जारी करण्यात आल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

2024 पर्यंत इथेनॉलमधून उत्पन्नाचा वाटा पन्नास टक्के

राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉलची स्थापित क्षमता 264 कोटी लिटर्सइतकी असली, तरी 200 कोटी लिटर्सइतके इथेनॉल उत्पादन तयार होत आहे. त्यामध्ये नव्याने 100 कोटी लिटर्सने वाढ अपेक्षित असल्याचे सांगून ते म्हणाले की, ऑईल कंपन्यांना इथेनॉलपुरवठा करताच 21 दिवसांनी साखर कारखान्यांना रक्कम मिळते. त्यातून कारखान्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षी 134 कोटी लिटर इथेनॉलपुरवठ्याच्या निविदा भरल्या असून, नोव्हेंबर महिन्यापूर्वी तेवढा पुरवठा होईल. 2024 पर्यंत देशात साखर उद्योगामध्ये उसापासूनचे पन्नास टक्के आणि इथेनॉलमधून पन्नास टक्के उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news