सहकारी संस्थांचे बळकटीकरण व्हावे; सहकारमंत्री अतुल सावे यांच्या सूचना
पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'विविध शासकीय योजनांची जोड मिळाल्यास सहकारी संस्थांच्या बळकटीकरणाला चालना मिळू शकते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने (एमसीडीसी) सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिल्या आहेत. एमसीडीसीची 41 वी संचालक मंडळाची सभा सहकारमंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुल येथे सोमवारी (दि.29) सकाळी पार पडली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
यावेळी सहकार विभागाचे सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, महामंडळाचे संचालक व सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पणन संचालक सुनील पवार, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे व अन्य संचालक
उपस्थित होते. देशात सहकाराचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. सद्य:स्थितीत सहकार क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांमार्फत विविध कृषी व कृषिपूरक उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
एमसीडीसीने मागील तीन वर्षात 385 शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांच्या सहाय्याने सुमारे 48 हजार मे.टन खते थेट शेतकरी वर्गाला उपलब्ध करून दिली असून, त्यातून सुमारे 66 कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे. कृषी निविष्ठा विभाग व प्रशिक्षण विभागाने केलेल्या कामकाजाने सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत झालेल्या फायद्यामुळे या विभागांनी कामाची व्याप्ती वाढविण्याच्या सूचना यावेळी सहकार मंत्र्यांनी दिल्या. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी आभार मानले.

