ससूनमध्ये रुग्णांची गर्दी; मात्र गोंधळ नाही

ससूनमध्ये रुग्णांची गर्दी; मात्र गोंधळ नाही
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्य सरकारने एचएमआयएस सिस्टिम बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे बुधवारी ससून सर्वोपचार रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्ण आणि कर्मचार्‍यांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवले. मात्र, गुरुवारी खिडक्यांमधील कर्मचार्‍यांची संख्या वाढवल्याने बाह्यरुग्ण विभागातील काम सुरळीत झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. रुटीन ओपीडी असल्याने सकाळच्या वेळेत 12 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यातील 16 वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये 2009 पासून राबवला जाणारा हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टिम हा प्रकल्प 5 जुलैपासून अचानक बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

निर्णयाचा फटका ससून रुग्णालयातील कामकाजाला बसल्याचे 6 जुलैला पाहायला मिळाले. केसपेपर काढण्यापासून रुग्णाच्या तपासण्या करेपर्यंत सर्व काम लेखी स्वरूपात करावे लागले. आदल्या दिवशीचा गोंधळ लक्षात घेऊन गुरुवारपासून (7 जुलै) कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्यात आली. तिन्ही शिफ्टमध्ये मिळून 18 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी 1700 रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले. ससून रुग्णालयात 'एचएमआयएस' सिस्टीम बंद केल्यानंतर बुधवारी बराच गोंधळ उडाला होता. केसपेपरच्या काउंटरची आणि कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्यात आल्याने गुरुवारी हा गोंधळ झाला नाही. कामाचा ताण वाढला असला तरी कर्मचार्‍यांनी तो व्यवस्थित हाताळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ओपीडीमध्ये केसपेपर काढणे, भरती असलेल्या रुग्णांची फाईल बनवणे यासह इतर कामांसाठी तीन शिफ्टमध्ये अतिरिक्त 6 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.

नवीन यंत्रणा कधी येणार?
एचआयएमएसमध्ये अनेक त्रुटी असल्याने ससून रुग्णालयातील काही विभागप्रमुखांनी नाराजी नोंदवली होती. आता एचआयएमएसच्या जागी अधिक अद्ययावत यंत्रणा आणली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ही यंत्रणा नेमकी कधी कार्यरत होणार, याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

राज्य शासनाकडून आलेल्या आदेशाप्रमाणे काम करण्यात येत आहे. बुधवारी केवळ काही वेळ गोंधळ उडाला. मात्र, गुरुवारी कर्मचार्‍यांची संख्या वाढवल्याने रुग्णांचे हाल झाले नाहीत. तीन शिफ्टमध्ये अतिरिक्त 6 कर्मचारी असे मिळून एकूण 18 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णांचे हाल होणार नाहीत, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

                                  – डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news