संतोष जाधवच्या कोठडीत वाढ

संतोष जाधव
संतोष जाधव

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सुनील जाधव याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 'जाधवच्या सांगण्यावरून त्याच्या साथीदारांनी मध्य प्रदेशातून पंधरा पिस्तुले आणली.असे तपासात समोर आले आहे. फरारी जॅक ऊर्फ अमित पंडित व हनुमान ऊर्फ सचिन बिश्नोई यांनी त्यासाठी मदत केल्याचे समोर आले आहे,' अशी माहिती विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयाला दिली. कोठडीची मुदत संपल्याने जाधवला गुरुवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. फरगडे म्हणाले, 'मंचर पोलिस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असताना जाधव याने फिर्यादीकडे 50 हजार रुपयांचा हप्ता मागण्यासाठी नहार, थोरात व जाधव यांना पाठविले होते. तसेच जयेश रतिलाल बहिरम व गणेश सुरेश तारू यांनी संतोष जाधवच्या सांगण्यावरून मध्य प्रदेशातून पंधरा पिस्तुले आणली. त्यानंतर बहिरम याने एक पिस्तूल ठेवत पाच पिस्तुलांचे साथीदारांना वाटप केले. यामध्ये रोहित तिटकारे याला दिलेल्या चार पिस्तुलांपैकी तीन त्याने वैभव तिटकारे याला दिली होती. ती घर झडतीदरम्यान जप्त करण्यात आली आहेत. गुन्हा करण्याच्या एक महिनाअगोदर आरोपी हे वैभव तिटकारे याच्या घरी एकत्र भेटल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.'

आरोपीला मध्य प्रदेश येथे नेऊन सखोल तपास करायचा आहे. फरारी असलेले पंडित व बिश्नोई यांच्याबाबत जाधवकडे तपास करायचा आहे. जाधव हा राजस्थान, गुजरात येथे वास्तव्याला होता. त्याला कोणी आश्रय दिला याचा तपास करायचा आहे. जाधव बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याने त्याने टोळीशी संबंधित काही गुन्हे केले आहेत का, तसेच जाधव व त्याच्या साथीदारांविरुद्ध पुणे ग्रामीण, ठाणे जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या स्वरूपाचे त्यांनी इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का, याचा तपास करायचा आहे. त्यांनी गुन्हेगारीमधून कमावलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा शोध घेऊन ती जप्त करायची असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अ‍ॅड. फरगडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करीत त्याच्या पोलिस कोठडीत 14 दिवसांची वाढ केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news