संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेवांनी संवत्सर ग्रामी समाधी घेतली. हे संवत्सर ग्राम म्हणजेच आजचे सासवड. सोपानदेवांना वारकरीकाका, काकासाहेब इ. नावांनी संबोधतात. विविध संत क्षेत्रावरून त्या त्या संतांच्या पालख्या निघायला सुरुवात झाली तेव्हा सासवड येथूनही संत सोपानकाकांची पालखी सुरू करावी, असा विचार देवस्थानचे तत्कालीन वहिवाटदार वै. ज्ञानेश्वर माऊली गोसावी यांनी केला. तेव्हा पंढरपूरचे फडकरी वै. धोंडोपंत दादा अत्रे यांनी मदत केली. 1910च्या सुमारास पालखी सोहळा सुरू झाला. सोहळ्याची सर्व जबाबदारी धोंडोपंत दादांकडे असे. पुढे काही मतभेद झाल्यावर धोंडोपंत दादांनी अंग काढून घेतले. सर्व जबाबदारी गोसावी मंडळींकडे आली.
ज्येष्ठ वद्य द्वादशी हा संत सोपानकाकांच्या प्रस्थानाचा दिवस. आदल्या दिवशी एकादशीला माऊलींची पालखी सासवड मुक्कामी येते. गर्दीमुळे माऊलींच्या पालखीचा मुक्काम सोपानकाका समाधी मंदिरात न होता गावाबाहेर पालखी तळावर होतो. द्वादशीला सोपानदेव संस्थानतर्फे माऊलींना नैवेद्य पाठवला जातो. सोपानकाकांच्या प्रस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्थानाच्या वेळेस मुख्य मंडपात समाधीसमोर भजन होते. ज्येष्ठ वद्य द्वादशी हा संत निवृत्तीनाथांचा समाधी दिवस. त्यामुळे सुरुवातीला निवृत्तीनाथ महाराजांना नमन करणारा अभंग म्हणतात. त्यानंतर 'माझ्या वडिलांची मिराशी गा देवा । तुझी चरण सेवा पांडुरंगा ॥' हा प्रस्थानाचा अभंग म्हणतात. या अभंगात तुकोबांनी पांडुरंगाची सेवा ही आपली मिराशी म्हणजे वतनदारी आहे. ही वंशपरंपरेने चालू आहे, अशी भावना व्यक्त केली आहे. अभंग झाल्यावर पादुका पालखीमध्ये आणून ठेवतात.
पादुका पालखीत ठेवण्याचा मान केंजळे घराण्याकडे आहे. प्रस्थानानंतर पालखी गावात न विसावता पहिल्या मुक्कामाकडे मार्गस्थ होते. सोपानकाकांची पालखी पूर्वी पुरंदर पायथ्यावरून शिरवळमार्गे पंढरपूरला जात असे. पानशेत धरण फुटल्यावर मार्ग बदलला व जेजुरी, वाल्हे यामार्गे पालखी जाऊ लागली. दहा-बारा वर्षांपूर्वी माऊलींचा पालखी सोहळा द्वादशीलाच पुढे निघाला. तेव्हा एकाच मार्गावर दोन सोहळे निघाल्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी सोपानकाकांच्या पालखीचा मार्ग पुन्हा बदलण्यात आला. आता पालखी सासवड, पांगारे, मांडली, निंबूत, सोमेश्वरनगर, कोर्हाळे बुद्रुक, माळेगाव बुद्रुक, निरवांगी, अकलूज, बोंडले, भंडीशेगाव, वाखरीमार्गे पंढरपूरला जाते.
सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यात सकाळी व रात्री कीर्तन होते. पालखी मार्गावर गोल रिंगण, उभे रिंगण, बकरीचे रिंगण होते. पंढरपूरजवळ आल्यावर ज्ञानेश्वर माऊली आणि सोपानकाकांच्या पालखीची भेट होते. दोन्ही संस्थानांकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. पालखी आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर मुक्कामी पोहोचते. एकादशीला चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिणा होते. पौर्णिमेला पालखी गोपाळपूरला काल्यासाठी जाते. त्यानंतर देवभेट होऊन दुपारी परतीचा प्रवास सुरू होतो. वद्य षष्ठीला काकांची पालखी सासवडला परत येते. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळाही सोपानकाका मंदिरात मुक्कामी येतो. रात्री माऊलींच्या सोहळ्यातर्फे कीर्तन होते. दुसर्या दिवशी सोपानदेव संस्थानतर्फे ज्ञानेश्वर माऊलींना व ज्ञानेश्वर माऊली संस्थानतर्फे सोपानदेवांना नैवेद्य दिला जातो. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला निरोप दिला जातो.
– अभय जगताप