श्री तुकाराम महाराज पालखी मुक्कामासाठी सराटी सज्ज

श्री तुकाराम महाराज पालखी मुक्कामासाठी सराटी सज्ज

बावडा : पुढारी वृत्तसेवा; जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम निरा नदीकाठी वसलेल्या सराटी (ता. इंदापूर) येथे दि. 4 जुलै रोजी आहे. मुक्कामासाठी सराटी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. पालखीतळावर भव्य शामियाना उभारत असून, परिसरातील इमारतींची रंगरंगोटी केली आहे. ग्रामपंचायतीने वारकर्‍यांसाठी पिण्याच्या पाण्याची, राहण्याची व्यवस्था केली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी शौचालय, स्नानगृहाची तसेच महिला वारकर्‍यांसाठी कपडे बदलण्याची व्यवस्था केली आहे.

सराटी पालखी तळ भव्य असून संपूर्णपणे काँक्रिटीकरण केले आहे. गावात स्वच्छता करून जंतुनाशकांची फवारणी केली आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थ पालखीच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती सरपंच पै. बापू कोकाटे, उपसरपंच सचिन कोकाटे, ग्रामसेवक अर्जुन साळुंखे, ग्रामसेवक हनुमंत पाटील, कोतवाल मधू गायकवाड यांनी दिली. गावातील प्रत्येक घरात वारकर्‍यांच्या भोजनाची व्यवस्था आपुलकीने केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी वारकर्‍यांना सोई-सुविधा उपलब्ध करण्यासाठी यंदा शासनाकडून अद्यापही अनुदान आलेले नाही. तसेच दोन वर्षांपूर्वीचे अनुदानही ग्रामपंचायतीस मिळाले नसल्याचे सरपंच बापू कोकाटे यांनी सांगितले.

निरेत पादुका स्नानासाठी पाणीच पाणी!
सराटी मुक्कामी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरा स्नान घालण्याचा महत्त्वाचा विधी असतो. अनेकदा निरा नदी जुलै महिन्यात कोरडी असल्याने टँकरने नदी पात्रात पाणी सोडण्याचा प्रसंग येतो. मात्र, यंदा निरा नदी तुडुंब वाहत असल्याने पादुका स्नानासाठी नदीपात्रात पाणीच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे वारकर्‍यांचा आनंद द्विगुणित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news