शेळगाव : पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथून मुक्काम उरकून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (दि. 1) शेळ्गाव स्टँड, चौपन्न फाटा व गोतोंडीतून निमगाव केतकी येथे मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याचे श्री संत मुक्ताबाई नगरीच्या शेळगाव पाटीवर सकाळी साडेनऊ वाजता आगमन झाले. भक्तिमय वातावरणात पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
शेळगाव स्टॅड वर पालखी सोहळ्याचे शेळगाव, गोतोंडी, कडबनवाडी, शिरसटवाडी,हगारेवाडी ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.तसेच शेळगाव स्टँड चौपन्न फाटा व गोतोंडी येथील विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारी 3 वाजता निमगाव केतकीकडे मुक्कामस्थळी मार्गस्थ झाला. ग्रामपंचायत प्रशासन तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तसेच मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या वतीने वारकर्यांना चहा, नाश्ता तसेच जेवणाची व पाण्याची सोय करण्यात आली होती.
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल जाधव, निरा- भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, माने उद्योग समूहाचे हनुमंत माने, भैरवनाथ सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव शिंगाडे, कृषीनिष्ठ शेतकरी मोहन दुधाळ, शेळगावचे सरपंच रामदास शिंगाडे, उपसरपंच मच्छिंद्र भोंग, कर्मयोगीचे संचालक राहुल जाधव आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वालचंदनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरसटवाडी, गोतोंडी उपकेंद्राने आरोग्य सेवा दिली.