बारामती : पुढारी वृत्तसेवा : युतीच्या बाजूने कौल दिलेला असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने जात गद्दारी केली. शिवसेनेसोबत जाणारी राष्ट्रवादी भाजपसोबत का जाऊ शकत नाही, असा विचार अजित पवार यांनी मांडला. विकासाच्या मुद्द्यावर ते महायुतीत सहभागी झाले, असे मत केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ येथील रयत भवनमध्ये रिपाइं-मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सूर्यकांत वाघमारे, विक्रम शेलार, परशुराम वाडेकर, अॅड. मंदार जोशी, सुरेंद्र जेवरे, संभाजी होळकर, जय पाटील, सचिन सातव, सुभाष सोमाणी, बाळासाहेब कोळेकर आदींची उपस्थिती होती.
'बरीच वर्षे मी होतो मा. शरद पवार यांचा साथी, पण आता मी आहे अजितदादांचा साथी, यामुळे सुनेत्रा पवार यांना निवडून देण्यासाठी मी आलो आहे बारामती', 'नरेंद्र मोदी यांनी वाढवली आहे देशामध्ये विकासाची गती, म्हणूनच बारामतीमध्ये विजयी होणार आहे आपली महायुती' अशी कवितेतून सुरुवात करून आठवले यांनी पुढे 'ही लढाई आहे पवार विरुद्ध पवार, पण आमच्या वहिनीच होणार आहेत लोकसभेवर सवार, आता बारामतीची जनता राहिली नाही गवार, म्हणूनच बारामतीचा किल्ला सर करणार आहेत अजित पवार', अशी कविता या वेळी त्यांनी ऐकवली. देशामध्ये नरेंद्र मोदी यांची विजयरथ रोखण्याची ताकद कोणामध्येच नाही, असे सांगून ते म्हणाले, मोदींच्या राज्यात सर्वसामान्यांना न्याय मिळाला आहे.
इंदिरा गांधींच्या काळात गरिबी हटावचा नारा दिला गेला. पण 70 वर्षे सत्तेत राहून काँग्रेसला ते जमले नाही. भ्रष्टाचार करत ते पुढे जात राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादीने मला शिर्डीत हरवले. मी काँग्रेसची साथ सोडल्यावर दिल्लीतील बंगल्यातील साहित्य बाहेर काढले गेले. मी त्यांच्यासोबत असताना केंद्रात मंत्रिपद दिले नाही, ते काम नरेंद्र मोदी यांनी केले. मी सत्तेमागे जातो असा आरोप केला जातो, पण मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांना सत्ता मिळते. मग आम्हाला एखादे मंत्रिपद नको का. एकाच्या ताकदीवर निवडून येणे शक्य नसेल, तर मित्रत्वाच्या नात्याने ताकद वाढवून निवडून येण्यात गैर काय ? असा सवाल त्यांनी केला. मते खाण्याचे राजकारण करणारे अनेक लोक आपल्या समाजात आहेत. त्यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी हल्ला केला. ठाकरे, राऊत कोणती भाषा बोलतात. राजकारणात त्यांनी नीतिमत्ता ठेवली आहे का, असा सवाल करून ते म्हणाले, एकनाथ शिंदे स्वतः 40 आमदारांसह बाहेर पडले, त्यांनी गद्दारी केलेली नाही. खरी गद्दारी ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन केली. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे त्यांचे धोरण असून, असा पोरखेळ चालेल का, असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग झाला. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. ते सोबत राहिले असते, तर धनुष्यबाण गेला नसता, असेही ते म्हणाले.
भीतीपोटी नव्हे, तर बहुमत घेऊन अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. शिवसेनेसोबत जातो तर भाजपसोबत का नाही, असा त्यांचा प्रश्न होता. आम्ही अजित पवार यांच्या सोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविक सुनील शिंदे यांनी केले.
हेही वाचा