

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: 'हर हर महादेव',"जय शिवराय'चा जयघोष, ढोल-ताशा, तुतारी, हलगीचा निनाद, विराट दुचाकी रॅली, भव्य पालखी सोहळा, शाहिरी पोवाड्यांच्या गजरात सिंहगडावर रविवारी (दि. 12) तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा व छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
गडाच्या वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे समाधिस्थळ परिसर शेकडो शिवभक्तांनी फुलून गेला होता. भगव्या ध्वजांनी गड सजला होता. विश्व हिंदू परिषद पुणे व शिवराज्याभिषेक अभिवादन समितीने याचे आयोजन केले होते. अभिवादन समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप व कार्यकर्त्यांनी संयोजन केले.
सकाळी पुण्यातील राजाराम पुलापासून सिंहगड किल्ल्याच्या वाहनतळापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. वाहनतळ ते नरवीर तानाजी मालुसरे समाधिस्थळापर्यंत शिवप्रेमींनी पारंपरिक रिवाजात पालखी मिरवणूक काढली. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज सुरेशदादा मोहिते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिषेक करण्यात आला.
आमदार भीमराव तापकीर, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, अण्णा राऊत, संजय मुरदाळे, हरिदास चरवड, श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी, किशोर पोकळे, सुमीत बेनकर आदी सहभागी झाले होते. डोणजे येथे भाजप दिव्यांग आघाडीचे बाजीराव पारगे व ग्रामस्थांनी रॅलीचे स्वागत केले. खडकवासला, धायरी आदी ठिकाणी शिवभक्तांनी मानवंदना दिली.