शिरूरच्या पूर्व भागात खरीप धोक्यात; दुबार पेरणीचे संकट गडद

शिरूरच्या पूर्व भागात खरीप धोक्यात; दुबार पेरणीचे संकट गडद
Published on
Updated on

निमोणे : पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्याच्या पूर्व भागावर पावसाचा रुसवा कायम असल्यामुळे या परिसरातीत खरीप हंगामात फक्त 25 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातच जुलैचा पहिला आठवडा संपत आला असताना पावसाने पाठ फिरवल्यामुळे मूग, बाजरीचा पेरा वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निमोणे, करडे, गुनाट, न्हावरे आदी परिसरात जूनच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस पडला. त्या पावसाच्या भरवशावर या परिसरातील शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील बाजरी, मूग, जनावरांचा चारा आदी पिकांच्या पेरण्या केल्या.

मात्र, जवळजवळ सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. पुरेसा पाऊस नसल्यामुळे या परिसरात फक्त 25 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. सद्यस्थितीत पावसाने दडी मारल्यामुळे जे उगवले तेदेखील करपून चालले आहे. पुढील चार ते आठ दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी दुबार पेरणीचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.

त्यातच सद्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने खते, बी बियाणे मोफत उपलब्ध करून दिली पाहिजे, वीजबिलाची सक्ती न करता शेतकर्‍यांना भावनिक आधार देण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अंकुश जाधव यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news