शिरूर-हवेलीत राष्ट्रवादी घायाळ, भाजप जोमात; मरगळ झटकून भाजपवाले लागले कामाला

शिरूर-हवेलीत राष्ट्रवादी घायाळ, भाजप जोमात; मरगळ झटकून भाजपवाले लागले कामाला

सीताराम लांडगे, लोणी काळभोर : राज्यात भाजपचे सरकार आल्याने शिरूर-हवेली मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून तालुक्यातील भाजपची बलाढ्य टीम कामाला लागली आहे. आगामी सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राष्ट्रवादीला एकतर्फी वाटणार्‍या या निवडणुका सत्तापरिवर्तनामुळे भाजपचा तगडा पर्याय उपलब्ध झाल्याने राष्ट्रवादी घायाळ झाली आहे. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात अडीच वर्षे मरगळलेले भाजपचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत.

शिरूर-हवेली मतदारसंघातील हवेलीतील भाजपचे नेते प्रदीप कंद, रोहिदास उंद्रे, दादा सातव, गणेश कुटे, संदीप भोंडवे, प्रवीण काळभोर, सुदर्शन चौधरी, अजिंक्य कांचन, संदीप सातव या नेत्यांना भाजपच्या राज्यपातळीवरील देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या नेत्यांची आणि जिल्ह्यातील भाजपचे ग्रामीण भागातील एकमेव आमदार राहुल कुल यांची थेट ताकद व राजकीय रसद मिळत असल्याने तालुक्यातील पुढे येऊ घातलेल्या सहकारातील व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपुढे एक प्रबळ आव्हान भाजप उभे करणार आहे, हे निश्चित झाले आहे. राजकीय डावपेच व पाठबळ, शासकीय यंत्रणेचा फायदा, यामुळे भाजप कार्यकर्ते जोमात आहेत.

यापूर्वी झालेल्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत अनेकवेळा भाजपने तगडे आव्हान देत यश संपादन केले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून बाबूराव पाचर्णे हे विजयी झाले होते, तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक गावांत आपले स्थान भाजपने अबाधित ठेवले आहे. सध्या शिरूर तालुक्यातील घोङगंगा कारखान्याची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना बळ देणार का? हे आगामी काळात पाहावयास मिळेल.

हवेली तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील पाच वर्षांचा 'फॉर्म्युला' पुन्हा वापरून प्रशासकीय संचालक मंडळ स्थापन करून तालुक्यातील कार्यकर्त्यांना भाजप बळ देईल. कारण, या संस्थेच्या निवडणुकीत भाजपकडे मतांचा कोटा नाही म्हणून कार्यकत्र्यांच्या आग्रही मागणीनंतर प्रशासकीय संचालक मंडळ स्थापन होईल, याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप मोठ्या ताकतीने उतरेल, हे नक्की.

शिरूर-हवेलीत राष्ट्रवादी घायाळ, भाजप जोमात
राज्यातील सत्ताबदलाचा परिणाम हा तालुका व गावपातळीवर होणार असल्याचे चित्र सध्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे.
राज्यात भाजपचे सरकार नसतानाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रदीप कंद यांनी अजित पवार यांच्या आव्हानाला थेट भेद देऊन विजय खेचून आणल्याने राष्ट्रवादीसमोर प्रदीप कंद हे शिरूर-हवेली तालुक्यात भाजपचा पर्याय समजला जातो आणि कंद हे फडणवीसांच्या विश्वासू टीममधील असल्याने शिरूर-हवेली तालुक्यातील भाजपला बळकटी मिळणार असून, राष्ट्रवादीला तुल्यबळ आव्हान देणार, हे निश्चित.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news