

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: उन्हाळी दीर्घ सुट्टी आता काही दिवसात संपणार आहे आणि नेहमीप्रमाणे 15 जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांमध्ये साफसफाईचे काम जोरात सुरू झाले आहे. एकीकडे पालकांची पाल्याची शाळेची जय्यत तयारी सुरू आहे. दुसरीकडे महापालिका शाळा आणि इतर खासगी शाळाही नवीन शैक्षणिक वर्षाच्या तयारीला लागले आहेत.
याबरोबरच गेले एक ते दीड महिना बंद असलेले वर्ग उघडून शाळेतील कर्मचार्यांकडून साफसफाई करुन घेतली जात आहे. कर्मचार्यांचीही जोरात सफाईची कामे सुरू आहेत. वर्गातील फळे, बाक, फरशी झाडून धुण्याचे काम सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांचे सॅनिटायजेशन करण्याचे काम सुरू आहे. सॅनिटायजर स्टॅण्डची व्यवस्था, सोशल डिस्टसिंगसाठी चिन्हे आदीची व्यवस्था केली जात आहे. सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जात असतो.
यामुळे सर्व शाळांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. कोरोनाच्या काळात गेली दोन वर्ष ऑनलाइन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले होते. यंदा दोन वर्षानंतर बरोबर 15 जून रोजी ऑफलाइन शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा चकाचक करण्याची धावपळ सुरू आहे.