

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: वेल्हे तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व इतर नुकसानाची पाहणी प्रशासनाने सुरू केली आहे. अतिवृष्टीत पानशेत खोर्यातील खाणू डिगेवस्ती येथे 15 जनावरांचा मृत्यू झाला. तर तालुक्यात 5 घरे जमीनदोस्त झाली आहेत, अशी माहिती वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. अतिवृष्टीमुळे गारठून जनावरांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कनुंजे व डॉ. भास्कर जाधव यांनी दिला आहे. त्यानुसार, 15 मृत जनावरांची नुकसान भरपाई संबंधित शेतकर्यांना शासन आदेशानुसार मिळावी, यासाठी तहसील कार्यालयाने प्रस्ताव सादर केला आहे.
अतिवृष्टीच्या पुरात नदी, ओढ्या-नाल्यांलगतच्या भात शेती व पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत, असे तहसीलदार शिंदे यांनी सांगितले. तोरणा तसेच रायगड जिल्ह्यालगतच्या अतिदुर्गम कर्नवडी, केळद, पासली आदी ठिकाणची तहसीलदार शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली. केळदचे सरपंच रमेश शिंदे, कर्नवडीचे नारायण पवार, तलाठी चव्हाण, शिंदे आदी सहभागी झाले होते. मांगदरी, राजगड भागात अतिवृष्टीच्या पुरात भात खाचरे, बांध तसेच पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी मांगडे यांनी केली आहे.