वेल्हे : अतिवृष्टीने पुणे-पानशेत रस्ता खचला

वेल्हे : अतिवृष्टीने पुणे-पानशेत रस्ता खचला

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : लागोपाठ तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या थैमानाने नद्या, ओढे- नाल्यांना पूर आले आहेत. पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यातील जनजीवन यामुळे ठप्प पडले आहे. पानशेत परिसराला जोडणारा खडकवासला धरणाच्या तीरावरील मुख्य पुणे-पानशेत रस्ता सोनापूरजवळ खचला आहे. धरण तुडुंब भरल्याने पाण्याच्या लाटा आदळून रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्ता वाहून जाऊन वाहतूक बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रायगड जिल्ह्यातल्या भोईणी, मुगाव, दासवे परिसरात थंडीने गारठून शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. अतिदुर्गम वाड्या-वस्त्यांतील शेकडो रहिवाशांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दासवे (ता. मुळशी) येथील धरणग्रस्त किरण कोंडिबा मरगळे म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेळ्या, मेंढ्या, गाई आणि बैल गारठून आजारी पडले आहेत. थंडीने शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तीन दिवसांत दहाहून अधिक शेळ्या, मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. दरम्यान रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

खडकवासला धरणाच्या तीरावरील सोनापूर व रुळे गावादरम्यानचा पुणे- पानशेत रस्त्याचा मोठा भाग खचला आहे. रस्त्याचा पूल व भराव खचून भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ता वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूला धरण व दुसर्‍या बाजूला डोंगर आहे, त्यामुळे येथून ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग नाही. रस्त्ता वाहून गेल्यास पानशेत, वरसगाव भागाचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात.
                                    – अंकुश पासलकर, स्थानिक कार्यकर्ते

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news