

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: वीर धरण 90 टक्के भरल्याने निरा नदीत शुक्रवारी (दि. 15) दुपारी दोन वाजेनंतर 6 हजार 118 क्युसेक पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी दिली. पावसाचे प्रमाण वाढल्यास अजून पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे, तसेच नदीपात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन नलावडे यांनी केले आहे. निरा खोर्यात अवघ्या पाच दिवसांत पडलेल्या संततधार पावसामुळे वीर धरण 90 टक्के भरले आहे.
पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले वीर धरण भरल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बारामतीसह चार तालुक्यांत सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला असला तरीही वीर धरणावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांत पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. मात्र पुढील दोन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने निरा नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी निरा नदीला इतिहासातील सर्वाधिक पुराची नोंद झाली होती. पाऊस उघडल्यानंतर बारामती तालुक्यातील शेतकरी आता खरिपातील पिके घेण्यासाठी लगबगीत आहे. पावसाअभावी तालुक्यात अजूनही पेरण्या रखडल्या आहेत. जिरायती भागातही संततधार पावसामुळे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले असले तरीही विहिरी, ओढे, नाले कोरडे असल्याने मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.