विषबाधा, मद्यांश चाचणी नाही; शवविच्छेदन करणारे डॉ. तावरे यांची उलट तपासणीदरम्यान माहिती

विषबाधा, मद्यांश चाचणी नाही; शवविच्छेदन करणारे डॉ. तावरे यांची उलट तपासणीदरम्यान माहिती

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे शवविच्छेदन करताना त्यांच्या मृतदेहात विषबाधा किंवा मद्यांश असल्याचा संशय नव्हता. त्यामुळे मृतदेहाची विषबाधा किंवा मद्यांश चाचणी करण्यास पोलिसांना सांगितले नाही,' अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयाला दिली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे ससून सर्वोपचार रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांची उलट तपासणी सोमवारी विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

बचाव पक्षातर्फे दाभोलकरांच्या शवविच्छेदनाच्या प्रक्रियेबाबत विविध प्रश्न अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर व अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड-वस्त यांनी उलट तपासणीदरम्यान विचारले. मृत व्यक्तीला विषबाधा झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी विविध अवयवांचा व्हिसेरा राखून ठेवला जातो. डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन केल्यानंतर संबंधित अवयवांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता का? तसेच मृतदेहाची अल्कोहोल किंवा पॉयझनिंगची चाचणी करण्यास पोलिसांना सांगितले होते का? अशी विचारणा बचाव पक्षाने केली.

काही विषाचा वास येत नाही तसेच काही तासांनंतर अल्कोहोलचासुद्धा वास येत नाही, हे बरोबर आहे का? असे बचाव पक्षाने विचारले. तसेच, डॉ. दाभोलकर यांच्यावर विषबाधा करून त्यांचा मृतदेह टेम्पोतून घटनास्थळी टाकल्याचा संशय व्यक्त केला. त्यावर मृतदेहात विष किंवा अल्कोहोल असल्याचा संशय नव्हता. कारण, त्याचा कोणताही गंध येत नव्हता. त्यामुळे अल्कोहोल किंवा पॉयझनिंगची चाचणी करण्यास पोलिसांना सांगितले नाही, असे डॉ. तावरे यांनी सांगितले.

डॉ. दाभोलकरांच्या मृतदेहाचे छायाचित्र दाखवून, मृतदेहावर बाह्य वस्तू होत्या का, शस्त्र कोणते होते, गोळ्या किती मिलिमीटरच्या होत्या, अशी प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्यावर काही प्रश्न फॉरेन्सिक तज्ज्ञांऐवजी बॅलेस्टिक तज्ज्ञांना विचारा, असे म्हणत सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी आक्षेप घेतला. या वेळी डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन करताना व्हिडीओ चित्रीकरण खंडित झाल्याच्या मुद्द्यावरही बचाव पक्षातर्फे प्रश्न विचारण्यात आले.

तो दोरा आहे की केस?

डॉ. दाभोलकर यांच्या मृतदेहाचे छायाचित्र बचाव पक्षाच्या वतीने डॉ. अजय तावरे यांना दाखविण्यात आले. त्यांच्या गळ्याच्या शेजारी केस आहे की काळा दोरा? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तो केस आहे असे बचाव पक्ष म्हणत होता; पण मोबाईलवर छायाचित्र नीट दिसत नसल्याने लॅपटॉपवर ते छायाचित्र तावरे यांना दाखविण्यात आले. त्यावर तो दोरा आहे, असे डॉ. तावरे म्हणाले. त्यावर दोर्‍याची जाडी किती आहे, असा प्रश्न बचाव पक्षाने केला असता 'सीबीआय'च्या वकिलांनी दोर्‍याची जाडी कशी विचारता येईल म्हणत आक्षेप घेतला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news