

बारामती; पुढारी वृत्तसेवा: वाळूने भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली अडविणार्या तलाठ्यास धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणत ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी चौघांविरोधात माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप बोराटे (पूर्ण नाव, पत्ता नाही), ऋषिकेश दिगंबर सोडमिसे, गणेश सोडमिसे (रा. सोमंथळी, ता. फलटण) व एका अनोळखीचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. कोर्हाळे बुद्रुक येथील तलाठी प्रल्हाद भीमाजी वाळुंज यांनी याबाबत फिर्याद दिली.
30 ऑगस्ट रोजी सांगवी ते शिरवली येथे ही घटना घडली. फिर्यादी हे सांगवीवरून परत येत असताना शिरवली गावच्या हद्दीत फलटण-बारामती स्त्यावर एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून त्यात वाळू भरून त्या बारामतीच्या दिशेने निघाल्या होत्या. फिर्यादीने तो ट्रॅक्टर अडवत मंडल अधिकारी रवींद्र पारधी यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. ट्रॅक्टर चालविणाराचे नाव दिलीप बोराटे असल्याचे समजले. त्याच्यासोबत ट्रॅक्टरमध्ये आणखी एक अनोळखी व्यक्ती बसला होता.
त्या मागे बुलेट गाडीवर (एमएच 11 सीडी 313) ऋषिकेश व गणेश सोडमिसे हे आले. त्यांनी फिर्यादी यांना तुम्ही ट्रॅक्टर का अडवला, अशी विचारणा केली. या वेळी बोराटे याने ट्रॅक्टर वळवून तो पुढे घेऊन जाऊ लागला. फिर्यादी यांनी पाठलाग करत ट्रॅक्टरपुढे त्यांचे वाहन उभे केले. या वेळी ऋषिकेश याने त्यांच्याशी धक्काबुक्की केली. त्याच वेळी ट्रॅक्टर पळवून नेण्यात आला. त्यानंतर ऋषिकेश व गणेश हे दोघे बुलेटवरून तेथून निघून गेले. घडलेला प्रकार तहसीलदारांना सांगत तलाठी यांच्याकडून या प्रकरणी फिर्याद देण्यात आली.