वसुली अधिकाऱ्यांची अजब वसुली ! फायनान्स कंपनीलाच लावला साडेसात लाखांचा चुना

वसुली अधिकाऱ्यांची अजब वसुली !  फायनान्स कंपनीलाच लावला साडेसात लाखांचा चुना

बारामती : पुढारी वृत्तसेवा

फायनान्स कंपनीत वसुली अधिकारी म्हणून काम करणार्‍याने परस्पर रक्कम गोळा करत ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. तसेच तीन दुचाकी वाहने ओढून आणत ती कंपनीकडे जमा न करता 7 लाख 61 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मंगेश गौतम कांबळे (रा. एकतानगर, बारामती) याच्याविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॅग फिनसर्व फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक विशाल बाळू पाटील यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बारामतीत स्टेशन रस्त्यावर या कंपनीचे शाखा कार्यालय आहे. तेथे 2019 पासून कांबळे हे कर्ज वसुली अधिकारी म्हणून काम पाहत होते. 2019-20 मध्ये त्यांनी तालुक्यातील कर्जदारांकडून वसूल झालेली रक्कम कंपनीत भरली. परंतु 2020 मध्ये कोरोना काळात त्यांनी परस्पर वसुली केली.

ही रोख रक्कम कंपनीला भरणे अपेक्षित असताना ती भरली नाही. कोरोना प्रादुर्भाव हटल्यानंतर कंपनीने कर्जदारांना फोन करत तसेच नोटिसा काढत कर्ज भरण्यास सांगितले. यावेळी 42 कर्जदारांनी कांबळे यांच्याकडे रोख स्वरूपात, त्यांच्या खात्यावर सुमारे 6 लाख 71 हजार रुपयांचा भरणा करून घेतल्याचे दिसून आले.

कंपनीने यासंबंधी कांबळे यांना बोलावून घेत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी प्रत्येकी 30 हजार रुपयांच्या तीन दुचाकी ओढून आणून त्या कंपनीकडे न दिल्याचे स्पष्ट झाले. कांबळे यांनी या प्रकरणी 7 लाख 61 हजार रुपयांचा अपहार केला. फेब्रुवारी  2022 मध्ये त्यांनी ही रक्कम तसेच दुचाकी जमा करतो, असे लेखी प्रतिज्ञापत्र कंपनीला दिले. परंतु त्यानंतरही त्यांनी पैसे भरण्यास तसेच दुचाकी जमा करण्यास टाळाटाळ केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news