पुणे : पुढारी वृत्तसेवा; सामाजिक न्याय विभागांतर्गत 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने होणार असून, प्रवेशाबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. पहिली निवड यादी 18 जुलैला जाहीर होणार आहे. दहावी-अकरावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी 30 जुलै असून, पहिली निवड यादी 5 ऑगस्टला जाहीर होणार आहे.
बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या, बारावीनंतर पदविका किंवा पदवी आणि एम. ए., एम. कॉम, एम. एस्सी. या पदव्युत्तर, पदवी, पदविका आदी अभ्यासक्रमांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे असून, पहिली निवड यादी 31 ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑफलाइन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 30 सप्टेंबर असून, पहिली निवड यादी 3 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे.
पुणे शहरामधील मुलांच्या शासकीय वसतिगृहामधील अर्जांचे वितरण व स्वीकृती संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी व मुलींच्या शासकीय वसतिगृहामधील अर्जांचे वितरण व स्वीकृती संत जनाबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, पुणे येथे आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यातील तालुकापातळीवरील शासकीय वसतिगृहांमध्ये अर्जाचे वितरण व स्वीकृती त्याच वसतिगृहामध्ये आहे.
विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
पुणे जिल्ह्यात मुलांची 13 व मुलींची 10 अशी 23 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. पुणे शहरात मुलींची 4 व मुलांची 7 अशी 11 वसतिगृहे व ग्रामीण भागात मुलांची 12 शासकीय वसतिगृहे आहेत. एकूण 1 हजार 208 जागा रिक्त आहेत. तरी, विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी केले