वराहमिहिरांच्या प्राचीन ग्रंथाद्वारे पर्जन्यमानाचा अचूक अंदाज बांधणे शक्य : जैवतंत्रज्ञानशास्त्रज्ञ डॉ. राघवेंद्र गायकैवारी

वराहमिहिरांच्या प्राचीन ग्रंथाद्वारे पर्जन्यमानाचा अचूक अंदाज बांधणे शक्य : जैवतंत्रज्ञानशास्त्रज्ञ डॉ. राघवेंद्र गायकैवारी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'भारतातील पर्जन्यमानाचे अंदाज हवामान खात्याकडून अधिकृतपणे येत असतात. मात्र, आपल्या वराहमिहिर या विद्वानाने आपल्या 'बृहत्संहिता' या प्राचीन ग्रंथात याबाबत उपयुक्त माहिती दिलेली असून, त्यावर गेली चार वर्षे संशोधन, निरीक्षण आणि अभ्यास केल्यानंतर पावसाचे प्रमाण वर्तविणे आणि अचूक अंदाज बांधणे खरे ठरत आहे,' असा दावा ज्येष्ठ जैवतंत्रज्ञानशास्त्रज्ञ डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी केला आहे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेमध्ये डॉ. गायकैवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या ग्रंथावर संशोधन सुरू असून, त्यासाठी केंद्र सरकारनेदेखील यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रयत्न सुरू आहेत. या विषयावर लवकरच एक चर्चासत्र भांडारकर संस्थेत आयोजित केले जाणार आहे. सुमारे 6 व्या शतकातील 'बृहत्संहिता' या प्राचीन ग्रंथामध्ये भूगोल, खगोलशास्त्र, पाणी शोधण्याच्या पध्दती, पर्जन्यमानशास्त्र, वनस्पतीशास्त्र, ज्योतिष, भूकंप अशा विविध विषयांचा अंतर्भाव आहे.

त्यातील पावसाचा अंदाज वर्तविण्याबाबत व पावसाच्या प्रमाणाबाबत अधिक अभ्यास केल्यानंतर काही अंदाज अचूकपण़े मांडता ये़णे शक्य झाले आहे. 'मेदनीय ज्योतिषशास्त्र' आणि अनेक प्राचीन ग्रंथांमधून असणार्‍या ठोकताळ्यांचा संख्याशास्त्रीय पद्धतीने एकत्रित विचार करून एक प्रमाणित पद्धती विकसित करणे शक्य आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

होळी व अक्षयतृतीयेला देता येतो अंदाज…
याबाबत सविस्तरपणे माहिती देताना डॉ. गायकैवारी म्हणाले की, प्रामुख्याने फेब्रुवारी महिन्यात येणारी होळी आणि एप्रिल महिन्यात येणारी अक्षयतृतीया हे दोन दिवस अशा पध्दतीच्या पर्जन्यमानाचा अंदाज घेण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. होळी आणि अक्षयतृतीयेच्या दिवशी दिवसा व रात्रीच्या वेळी वार्‍याचा असणारा वेग व त्याची दिशा आणि अवकाशातील ग्रह-तार्‍यांची स्थिती व त्यांची क्रांतिवृत्ते, यावरून कोणत्या भागात किती पाऊस पडेल, याचे सूक्ष्म अनुमान करणे शक्य आहे.

प्रामुख्याने गेल्या काही वर्षांमध्ये यावर अधिक अभ्यास करून व त्यानुसार एक प्रारूप बनवून पुण्यातील भूगाव आणि राज्यातील काही शहरांमध्ये निरीक्षणे नोंदवली व त्याचा अभ्यास केला आणि त्यातून पावसाचा अचूक अंदाज बांधणे शक्य झाले आहे. मान्सूनचे आगमन 27 मे रोजी केरळमध्ये, तर 8 जूनला रत्नागिरीत, 9 जूनला पुण्यात, 17 जूनला अहमदनगर येथे व 27 जूनला इंदूरला मान्सून पोहचेल. जून महिन्यात तुरळक पाऊस पुणे परिसरात होईल, असा अंदाज होता; तो तंतोतंत खरा ठरला.

दोन ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस…

मान्सूनपूर्व पाऊस देशात सरासरी कमी राहील, तर मान्सूनमध्ये महाराष्ट्रात पावसाचे चांगले प्रमाण राहील. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात चांगला पाऊस अपेक्षित आहे. ज्यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम चांगले जातील. दक्षिणेकडील भागापेक्षा मध्य भारत व विंद्याचलच्या वरच्या भागात अधिक पाऊस राहील.

दुसरीकडे, रत्नागिरीमध्ये 15 जुलैपासून पाऊस वाढेल, तर सिंधुदुर्गमध्ये तो कमी व्हायला लागेल. नागपूर, यवतमाळ येथे देखील पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील. मात्र, जळगावमध्ये हे प्रमाणे बरेच जास्त राहील, असे माझ्या निरीक्षणातून दिसते. देशभरात प्रामुख्याने 1 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत पाऊस चांगला राहील, तर मध्य भारतात प्रचंड प्रमाण राहील, असे दिसते.

2 ऑगस्टनंतर व सप्टेंबरमध्ये हेच प्रमाण मध्यम राहील, तर परतीचा मान्सून वेळेवर होईल व गेल्या वर्षापेक्षा अधिक चांगला राहील. नोव्हेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात पुण्यात पाऊस होणार नाही, तसेच तामिळनाडूत त्याचे प्रमाण उत्तम राहील, असाही दावा त्यांनी केला आहे.

कोण आहेत डॉ. गायकैवारी
डॉ. गायकैवारी हे आयआयटी खरगपूरचे विद्यार्थी असून, पुणे येथे स्थायिक आहेत. त्यांनी पुणे येथील नॅशनल केमिकल लॅब (एनसीएल)मधून जैवतंत्रज्ञान विषयात पीएचडी केली आहे. ते उद्योजक असून, त्यांचा औषधीनिर्मितीचा कारखाना आहे. त्यांना दहावीत त्यांच्या वडिलांनी वहारमिहिरांचे पुस्तक वाचायला दिले. तसेच, त्यांचे गणित चांगले असल्याने त्यांना ज्योतिषी गणित मांडण्याचा छंद लागला. एक आयआयटीयन असल्याने पुराणातील वैज्ञानिक रहस्ये शोधण्याची त्यांना आवड निर्माण झाली. यातूनच त्यांनी पावसावर अभ्यास करून आपले स्वतंत्र मॉडेल तयार केले आहे. दरवर्षी ते मे महिन्यातच पावसाचा अंदाज या मॉडेलद्वारे देतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news