वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भोर : पुढारी वृत्तसेवा: भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटात मागील आठवड्यात श्री वाघजाई देवीच्या मंदिराजवळ दरड कोसळल्याची ताजी घटना असताना पुन्हा या ठिकाणी दरड कोसळली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. भोर तालुक्यातील पश्चिम भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पश्चिम भागात असणार्‍या व भोर-महाड मार्गे कोकणात जाणार्‍या वरंधा घाटात श्री वाघजाई देवी मंदिराच्या पुढील बाजूस शुक्रवारी (दि. 8) पुन्हा दुपारी 3 वाजेच्या दरम्यान दरड कोसळल्याचे शिरगावचे पोलिस पाटील यांनी सांगितले.

रस्त्याच्या शेजारील कड्यातील दगडी रस्त्यावर पडल्या असून कोणतीही हानी झाली नाही. दरड रस्त्याच्या कडेला पडली असल्याने वाहने त्यातुन जाऊ शकत होती. बुधवारी (दि. 29 जून) याच श्री वाघजाई मंदिराजवळ प्रथमत: दरड पडली होती. त्यात तेथील हॉटेल व्यावसायिक जखमी झाला असताना दरड पुन्हा कोसळल्याने भीतीदायक परिस्थिती निर्माण होत आहे. दरड पडल्याचे कळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने पडलेल्या दरडीतील दगड बाजूला करण्यात आले.

शिरगावातील रस्ता खचण्याची भीती
महाड रस्त्यावरील शिरगाव येथे गटाराचे पाणी रस्त्यावरून जात असल्याने रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली असल्याचे शिरगाव ग्रामस्थांनी सांगितले. तुंबलेल्या मोर्‍यांतील गाळ, दगडी काढून मोर्‍या व गटारे स्वच्छ करण्याची गरज असल्याचे सांगून बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, तर घाटात दुसर्‍यांदा दरड पडली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार साळूंगण ते धारमंडप या दरम्यान सकाळपासून सतत पाऊस सुरू असल्याने तेथील रस्ता आणि त्यालगतचा डोंगराचा कच्चा मातीचा भाग (दरड) रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्या भागातील सर्व नागरिक, शेतकरी, प्रवास करणारे विद्यार्थी यांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत सदर रस्त्यावरून प्रवास टाळावा.

                                                               – सचिन पाटील, तहसीलदार, भोर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news