पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'दुर्मीळ, तसेच नामशेष होत चाललेल्या पश्चिम घाटातील वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी त्यांची रोपे तयार करून वनस्पती बँक तयार करणे आवश्यक आहे,' असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून सह्याद्री देवराई प्रकल्पाचे संस्थापक सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, दीपक पवार, आशुतोष शेंडगे, मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
या वेळी आवळा, बेहडा, ताम्हन, कडूनिंब, करंज, शिसू, काटेसावर, चिंच, सीताफळ आदी देशी प्रजातींची लागवड करण्यात आली.
पाटील म्हणाले, 'स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने 15 ऑगस्ट रोजी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून 70 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणार्या 75 व्यक्तींचा दुर्मीळ वृक्ष प्रजातीची भेट देऊन सन्मान करण्यात येणार असून, यामुळे झाडाला घरातील व्यक्ती समजून वृक्षासंबंधी भावनिक नाते तयार होण्यास मदत होईल. या भरे रोपवाटिकेत 33 प्रकारच्या देशी प्रजाती तयार करण्यात आलेल्या आहेत.